सुजॉय घोषच्या चित्रपटात शाहिद
थ्रिलर धाटणीचा असणार चित्रपट
प्रसिद्ध दिग्दर्शक सुजॉय घोषने स्वत:च्या नव्या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. तसेच त्याने याकरता बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यासोबत बोलणी सुरू केली आहे. घोष आता शाहिद कपूरच्या मदतीने थ्रिलर धाटणीचा चित्रपट साकारणार आहे. नव्या वर्षात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होईल.
‘कहानी’ आणि ‘बदला’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या घोषने नव्या चित्रपटाची कहाणी तयार केली आहे. परंतु याचा तपशील त्याने गुप्त ठेवला आहे. यात रहस्य आणि नाट्यामयतेचा जबरदस्त ताळमेळ दिसून येणार आहे. सुजॉय घोष यापूर्वी शाहरुख खान आणि सुहाना खानच्या ‘किंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होता. परंतु आता हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार आहे. यामुळे सुजॉयने आता शाहिद कपूरसोबतच्या चित्रपटावर लक्ष केंद्रीत केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुजॉय आणि शाहिद पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.