For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंथन साहित्य संमेलनात उलगडला शाहीर साबळे यांचा जीवनपट

10:50 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंथन साहित्य संमेलनात उलगडला शाहीर साबळे यांचा जीवनपट
Advertisement

बहुआयामी साबळे यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरांजलीसाठी आयोजन

Advertisement

बेळगाव : मंथन साहित्य संमेलनामध्ये कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जीवन प्रवास कलात्मकरीत्या उलगडण्यात आला. गीतकार, लोकनाट्या कलाकार, गायक, दिग्दर्शक, ढोलकी वादक आणि छायाचित्रकार असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या त्यांच्या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानेच झाली. गाण्याची आवड कृष्णाला सुचू देत नव्हती. अभ्यासाकडे दुर्लक्ष म्हणून आईने त्याला मामाकडे अंमळनेरला पाठविले. तिथे हिराबाई बडोदेकरांनी त्यांचे गाणे ऐकले. साने गुरुजींनीसुद्धा त्यांचे गाणे ऐकले. पण अभ्यासाचा मात्र फज्जा उडाला. पुन्हा आईकडे पसरणीला तो परतला. शाळा सुटली पण गाणं सुटलं नाही. भारुड, गोंधळ, लावणी, भलरी, कोळीगीत, वासुदेव, धनगर गीत, बाल्यानृत, मंगळागौर अशी लोकगीते त्यांनी सादर केली.

कार्यक्रमात ‘या गो दांड्यावरून’ हे कोळीगीत सादर झाले. कृष्णाच्या काकांनी त्याला मुंबईत गिरणीत कामाला लावले. मात्र, येथेच कृष्णाने एकनाथ महाराजांचे ‘विंचु चावला’ हे भारुड ऐकले आणि आपल्या आवाजांनी ते आजरामर केले. हे भारुड कलाकारांनी ठसक्यात सादर केले. दरम्यान, गावोगावी कार्यक्रम सुरू असताना कृष्णाची भानुमतीशी गाठ पडली, ती त्यांच्यावर भुलली आणि त्यांचा विवाह झाला. ही मल्हारीची कृपा म्हणत सादर झाली ‘मल्हारवारी.’ शाहीर साबळेंचा प्रवास उलगडता उलगडता त्यांना झालेले कर्ज, फिरत्या रंगभूमीची निर्मिती, दुष्काळामुळे अडचणीत झालेली वाढ हे सर्व धक्के पचवूनही शाहिरांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून गेलेले वैभव पुन्हा मिळविले. याच दरम्यान कार्यक्रमात ‘अरे कृष्णा, बिकट वाट, दादला नको गं बाई’ ही गीते सादर झाली. पुढे मराठी नाट्या संमेलनाचे अध्यक्षपद, पद्मश्रीसह अनेक पुरस्कार यांचे ते मानकरी ठरले. निराधार कलाकारांना शिकायला मिळावे यासाठी त्यांनी शाहीर साबळे प्रतिष्ठानची स्थापना केली आणि 20 मार्च 2015 रोजी हा तळपता सूर्य लोप पावला. त्यांना आदरांजली वाहताना विठूचा गजर करण्यात आला. नीता कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित या कार्यक्रमाने वाहवा मिळविली. याचे कारण कलाकारांचे सांघिक सादरीकरण आणि समजून केलेली भूमिका हे होय. त्याला अनुरुप राही कुलकर्णी व प्रिया कवठेकर यांचे निवेदन आणि सर्वच कलाकारांचे उत्कट सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम दाद मिळवून गेला. यामध्ये शीतल गोगले यांचे नृत्यदिग्दर्शनही महत्त्वाचे होते.

Advertisement

उत्तम सादरीकरण...

हा कार्यक्रम पुन: पुन्हा इतरत्र व्हायला हवा. मात्र, अशा कार्यक्रमांसाठी कलाकारांना पुरेशा मोकळेपणाने वावरता येईल, सहजगत्या हालचाली करता येतील, असा रंगमंच मिळायला हवा. सादरीकरण उत्तम झाले. कलाकारांचे परिश्रम दिसून आले तरी अरुंद रंगमंचामुळे या कार्यक्रमाचा संकोच झाला, असे मात्र वाटून गेले.

Advertisement
Tags :

.