वनडेत शाहीन आफ्रिदी नंबर 1!
भारताच्या कुलदीप यादवची चौथ्या स्थानी घसरण, आफ्रिकेच्या केशव महाराजने गमावले अव्वल स्थान
वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी वनडे आणि टी 20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पुन्हा एकदा नंबर 1 वनडे गोलंदाज बनला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याच्याकडून नंबर वनचा खिताब हिसकावून घेतला. आफ्रिदीने तीन स्थानांची झेप घेत अव्वलस्थान पटकावले आहे. तर केशव तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
शाहीनने नुकतेच्ग ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्याने तीन सामन्यांत 8 विकेट्स घेत पाकच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. याआधी त्याने वनडे विश्वचषक 2023 मध्ये नंबर-1 मानांकन मिळवले होते. या कामगिरीचा त्याला फायदा झाला असून आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत शाहीन आफ्रिदीने तीन स्थानांची झेप घेतली आहे. आता त्याचे 696 रेटिंग गुण झाले, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान 687 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. द.आफ्रिकेचा केशव महाराज 674 गुणासह तिसऱ्या, भारताचा कुलदीप यादव 665 गुणासह चौथ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, टॉप 10 मध्ये दिग्गज गोलंदाज बुमराह सहाव्या तर मोहम्मद सिराज सातव्या स्थानी आहे.
फलंदाजांच्या यादीत टॉप 10 मध्ये तिघे भारतीय
फलंदाजांच्या यादीत पाकच्या बाबर आझमने 825 गुणासह आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. याशिवाय, टॉप 10 मध्ये तिघा भारतीयांचा समावेश आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या, शुभमन गिल तिसऱ्या तर विराट कोहली चौथ्या स्थानावर कायम आहे. याशिवाय, श्रेयस अय्यर 12 व्या व केएल राहुल 17 व्या स्थानावर आहेत.
टी 20 क्रमवारीत सुर्याला एका स्थानाचा फटका
भारतीय क्रिकेट संघाचा टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादवला आयसीसी क्रमवारीत यावेळी मोठा फटका बसला आहे. जिथे तो पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला होता. पण आता त्याला तिथूनही खाली यावे लागले आहे. सूर्या तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याला इंग्लंडच्या फिल सॉल्टने मागे टाकत दुस्रया क्रमांकावर कब्जा केला आहे. तर ट्रॅव्हिस हेड अव्वल स्थानी कायम आहे. यशस्वी जैस्वालचीही घसरण झाली असूना तो सातव्या स्थानावर आहे. याशिवाय, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने टी 20 क्रमवारीत 27 स्थानांची झेप घेत 39 वे स्थान पटकावले आहे.
गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीला तगडा फायदा
द.आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने ताज्या टी 20 क्रमवारीत तब्बल 110 स्थानांनी झेप घेत 64 वे स्थान पटकावले आहे. तो आता हार्दिक पंड्यासोबत संयुक्तरित्या 64 व्या स्थानी आहे. टॉप 10 गोलंदाजामध्ये रवि बिश्नोई वगळता एकाही भारतीयाचा समावेश नाही. बिश्नोई सध्या सातव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या स्थानी असून लंकेचा वनिंदू हसरंगा दुसऱ्या तर विंडीजचा अकिल हुसेन तिसऱ्या क्रमाकांवर आहे.