शदमान इस्लाम शतकाच्या उंबरठ्यावर
विंडीजविरुद्ध पहिली कसोटी, पहिला दिवस : अंधुक प्रकाशाचा व्यत्यय, बांगलादेशच्या 3 बाद 213
वृत्तसंस्था, ढाका
विंडीजविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी, खराब प्रकाशामुळे खेळ लवकरच थांबवावा लागला त्यावेळी बांगलादेशने पहिल्या डावात 3 बाद 213 धावा जमविल्या होत्या. बांगलादेशचा सलामीवीर शदमान इस्लाम 99 धावांवर नाबाद राहिला. शदमानने आपल्या खेळात 10 चौकार लगावले. हिपच्या दुखापतीतून सावरून परतलेला लिटन दास 10 धावांवर त्याची साथ देत होता.
बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो शदमानच्या संयमी खेळीमुळे सार्थ ठरला. वेस्ट इंडीजच्या नवीन चेंडूवरील गोलंदाज जेडेन सील्स आणि शामार जोसेफ यांनी अचूक मारा करत बांगलादेशवर दबाव निर्माण केला. त्यांच्या सातत्यपूर्ण गोलंदाजीचे फळ त्यांना मिळाले. जेंव्हा तान्झिद हसन (7 धावा) याने सील्सच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लिपमध्ये झेलला गेला. शदमानने मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर वारंवार फटके मारण्याचा मोह टाळला आणि मोमिनुल हकसोबत डाव सावरला.
या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडीजला रोखून धरले. डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकनने मोमिनुलला (28 धावा) मिडऑफवर झेलबाद करून भागीदारी तोडली. त्यानंतर, वॉरिकनने पॅडल स्वीप करणाऱ्या कर्णधार शांतोला (19 धावा) पायचीत केले. शदमानने एक धाव घेत आपले 10 वे अर्धशतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजविरुद्धचे त्याचे हे चौथे अर्धशतक होते. शदमानला तौहीद हृदोयच्या रुपाने एक उत्तम साथीदार मिळाला. चार महिन्यांपूर्वी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केल्यानंतर, हृदोयचा हा पहिलाच सामना होता. या जोडीने 88 धावा जोडल्या. परंतु दमट हवामानामुळे स्नायुंमध्ये पेटके आल्याने हृदोयला मैदान सोडावे लागले. तो 42 धावांवर नाबाद होता. शदमान 96 धावांवर असताना खराब प्रकाशामुळे सुमारे 30 मिनिटांचा व्यत्यय आला. खेळ पुन्हा सुरू झाल्यावर तो आपल्या तिसऱ्या कसोटी शतकाच्या जवळ पोहोचला होता. परंतु दिवस लवकर संपल्यामुळे त्याला शतकापासून वंचित रहावे लागले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 74 षटकांत 3 बाद 213 : शदमान इस्लाम खेळत आहे 99, तौहिद हृदोय नाबाद 42.
