शॅक कामगारांनी घेतले दोघांचे बळी
हरमल येथे स्थानिक युवकाचा, कळंगुटमध्ये पर्यटकाचा
हरमल, पणजी : हरमल येथे व्यावसायिकांसोबत झालेल्या कथित भांडणप्रकरणातून झालेल्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हरमल येथील शॅक कामगाराला अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून या प्रकरणात 37 वर्षीय स्थानिक व्यावसायिकाचा मृत्यू झाला. अटक केलेल्याचे नाव सुरेंद्र कुमार (39 वर्षे, हिमाचल प्रदेश) असे आहे. काल सोमवारी रात्री त्याला न्यायाधीशांसमोर उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. रविवार 26 जानेवारीच्या संध्याकाळी हरमल समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या या भांडणात 37 वर्षीय स्थानिक व्यावसायिक अमर बांदेकर याचा मृत्यू झाला. संध्याकाळच्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना तेथे वाटेवरच टाकण्यात आलेल्या खाटांचा, टेबलांचा, खुर्च्यांचा त्यांना अडथळा झाला, ते सामान हटविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेव्हा शॅक कर्मचाऱ्याने त्यांच्याशी वाद निर्माण केला आणि लगेच मारामारी सुरु झाली. काहीवेळाने आणखी शॅक कर्मचारी आले, आणि त्यांनीही अमरला मारहाण केली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अमरच्या मित्रांनी 108 रुग्णवाहिका बोलावून त्यातून तुये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांचा अहवाल घेणार
या प्रकरणात फक्त एकच व्यक्ती गुंतलेली असल्याचे आढळून आले आहे. जर आणखी लोक गुंतले असतील तर आम्ही कारवाई करू अशी माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे. पोलिस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही शस्त्राने जखमा झाल्याच्या खुणा अमर बांदेकर यांच्या शरीरावर नाहीत. तरीही डॉक्टरांचा अहवाल घेणार आहोत. या घटनेमुळे लोकांनी गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा आणि संघर्ष व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. हरमल रहिवाशांनी समुद्रकिनाऱ्यावरील शॅक चालक आणि त्यांच्या कामगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कळंगुट येथे घेतला पर्यटकाचा बळी
कळंगुट येथील मारामारीत आंध्र प्रदेशातील बोल्ला रवी तेजा या 28 वर्षीय पर्यटकाचा शॅक कर्मचाऱ्यांशी झालेल्या भांडणात मृत्यू झाला. जेव्हा तेजा आणि त्याच्या मित्रांनी शॅक बंद होण्याच्या वेळेपूर्वी जेवणाची विनंती केली तेव्हा वाद सुरू झाला, ज्यामुळे हाणामारी झाली आणि परिणामी तेजावर प्राणघातक हल्ला झाला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शॅक मालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.