एसजीबीआयटी, गोगटे उपांत्यफेरीत
बेळगाव : केएलएस जीआयटी महाविद्यालय आयोजित चॅम्पियन चषक आंतरमहाविद्यालयीन साखळी फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून जीआयटी, एसजीबीआयटी, जीआयटी अ संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जीआयटी अ संघाने सेंट पॉल्स पीयु कॉलेजचा 4-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात केएलई फार्मा संघ मैदानात न आल्याने जीआयटी संघाला पुढे चाल देण्यात आली. तिसऱ्या सामन्यात लिंगराजने एसजीबीआयटी संघाला 1-1 अशा बरोबरीत रोखले. चौथ्या सामन्यात सेंट पॉल्स संघ न आल्याने जैन तांत्रिक संघाला पुढे चाल देण्यात आली. पाचव्या सामन्यात एसजीबीआयटी संघाने केएलई फार्मासी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. मंगळवारी सकाळी पहिला उपांत्य फेरीचा सामना केएलएस जीआयटी वि. एसजीबीआयटी यांच्यात सकाळी 8.30 वाजता. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना केएलई सीईटी वि. गोगटे कॉमर्स यांच्यात 10 वा. होणार आहे.