तीन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्त्याचाराने खळबळ
कळंगुट येथील हॉटेलातील दुर्देवी घटना : अल्ताफ, ओम या दोघा युवकांना अटक
पणजी : कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्त्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. या लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघा युवकांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा गुन्हा आगशी पोलिसस्थानकात नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंगुटमधील एका हॉटेलात तीन अल्पवयीन मुलींना नेऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचार झालेल्या पीडित अल्पवयीन मुली 11, 12 आणि 15 वयोगटातील आहेत.
पोलिसांत या प्रकरणाचा गुन्हा नोंद होताच आगशी पोलिसांनी तपासाची गती वेगाने फिरवत कळंगुट येथील हॉटेलावर छापा टाकला. त्यानंतर तिन्हीही अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका करून संशयितांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोघेही संशयित पर्वरी भागातील रहिवासी असून, अल्ताफ मुजावर (वय 19), ओम नाईक (वय 21) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांवरही भारतीय दंड सहिता आणि पोक्सो कायदा तसेच गोवा बालकायदा 2005 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी तिन्हीही पीडित मुलींची सुटका करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, इस्पितळ बांबोळी या ठिकाणी पीडित मुलींचे जबाब नोंदविण्यात आले असून, संशयितांनी या पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. हॉटेलच्या दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये संशयित आरोपी मुलींसोबत थांबले होते. या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत गावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका पवार, उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर यांच्यामार्फत सुरू आहे.
विशेष पथकाची कारवाई
आगशी पोलिसस्थानकात 8 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याच्या दोन तक्रारी नोंद झाल्या होत्या. त्यापैकी एका तक्रारदाराकडून त्याच्या दोन मुली तर अन्य एका तक्रारदाराने आपली एक मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. या दोन्ही तक्रारीमध्ये 11, 12 व 15 वर्षांच्या अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याने आगशी पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक नेमले होते. या पथकाचे नेतृत्व करताना पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर यांनी तांत्रिक आणि स्थानिक माहितीच्या आधारे हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यात या तिन्ही मुलींची सुटका करण्यात आली. त्याच हॉटेलमध्ये असलेल्या दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी लागलीच अटक केली.