मतिमंद युवतीवर लैंगिक अत्याचार
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर : अवघ्या तासांत पाच जणांना अटक
मडगाव : अठरा ते बावीस दरम्यानच्या वयातील पाच संशयित आरोपींनी एका मतिमंद युवतीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन अटक केली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडलेली असली तरी त्याबाबत पोलिसांना जेव्हा माहिती मिळाली त्याच्यानंतर अवघ्या काही तासातच या आरोपींना पोलिसानी अटक करण्यात यश मिळविले. दक्षिण गोव्याच्या पोलिस मुख्यालयाने या संबंधी शुक्रवारी सायंकाळी उशिरा सविस्तर माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत: विद्यामंदिर, चिखली वास्को येथील 18 वर्षीय आदील अब्दुल करीम लालसाब अल्गुर, मांगूर हिल वास्को येथील मशिदीजवळ राहणारा महम्मद अली मुल्ला (18), गांधीनगर वास्को येथील 18 वर्षीय विरेश अम्री आगुआंदा आणि एलमाँत थिएटर सडा वास्को येथील 18 वर्षीय महम्मद यासिर, खारीवाडा वास्को येथील 18 वर्षीय शहजाद महम्मद समीम शेख
या प्रकरणातील पीडित युवती ही मडगाव बसस्थानकाजवळ आली असता आदील नावाच्या संशयित आरोपीने या युवतीकडे मैत्री केली आणि तिला बसमधून वास्को बस स्थानकावर नेली. वास्कोला पोचल्यानंतर आरोपी आदेल याने तेथे ठेवलेल्या दुचाकीवर तिला बसविले आणि दाबोळी जंक्शनपर्यंत नेले. तेथे पोचल्यानंतर या प्रकरणातील इतर चैघे एका बालेनो कारमधून आले आणि या युवतीला कारमध्ये कोंबून कासावली येथील एका फ्लॅटवर नेले. या फ्लॅटवर या पीडित युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाने दिली आहे. ही घटना 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 पर्यंत घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या एकंदर प्रकाराच्या घटनेची माहिती फातोर्डा पोलिसाना मिळताच फातोर्डा पोलिसानी तपासकार्य हाती घेतले. अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. या दुष्कृत्यात गुंतलेल्या पाचही आरोपींना अटक केली तसेच या गुन्ह्यासाठी जी कार वापरण्यात आली ती कारही जप्त केली. पाच मोबाईल आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. फिंगर प्रिंट पथकाची सेवा घेण्यात आली आणि तपासकामासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत, मडगाव, केपे व वास्को पोलिस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलिसस्थानकाचे पोलिस निरीक्षक नाथान आल्मैदा, मेल्सन कुलासो, रियांका नाईक, अर्जुंन सांगोडकर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच तत्परता दाखविल्यामुळे या घटनेचा तपास लगेच लागू शकला. या सर्व पाचही संशयित आरोपींना न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने या पाचही आरोपींना 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.