कोलकात्यात पुन्हा लैंगिक अत्याचार
पंचतारांकित हॉटेलात बलात्कार, दोघांना अटक
वृत्तसंस्था / कोलकाता
येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद अद्याप उमटत असतानाच, पंचतारांकित हॉटेलात एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. एका पार्टीच्या वेळी हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिडित महिलेने याप्रकरणी तक्रार सादर केली आहे. पश्चिम बंगाल सरकारने गेल्या मंगळवारीच ‘अपराजिता बलात्कार विरोधी विधेयक’ संमत केले होते. बलात्कार पिडीतेचा बलात्कारामुळे मृत्यू झाल्यास किंवा ती बेशुद्धावस्थेत गेल्यास गुन्हेगाराला 10 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे. हे विधेयक संमत झाल्यानंतर चोवीस तासांच्या आतच हे नवे प्रकरण घडले आहे.
कठोर कारवाई करणार
पंचतारांकित हॉटेलात घडलेल्या अत्याचाराची त्वरेने चौकशी केली जाईल आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे वक्तव्य कोलकाता पोलिसांनी केले आहे. बुधवारी ही घटना उघडकीस आली असून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या हॉटेलात एका पार्टीचे आयोजन करण्यात येत होते. या पार्टीत ही महिला सहभागी होती, अशी माहिती देण्यात आली. पार्टीत सहभागी असलेल्यांपैकी काहींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एक स्थानिक आणि एका दिल्लीच्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारीत नावे उघड
महिलेने सादर केलेल्या तक्रारीत संशयितांची नावे देण्यात आली असल्याचे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात आली. घटना घडलेल्या स्थानातून पुरावे गोळा करण्याचे काम केले जात आहे. संशयितांची डीएनए चाचणी केली जाणार असून या चाचणीतून हे दुष्कर्म त्यांनीच केले आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी पंचतारांकित हॉटेलातील घटनास्थळ सील केले असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा सुरु केले जाईल, अशी माहिती दिली गेली.
आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
9 ऑगस्टला कोलकाता येथे घडलेल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात पश्चिम बंगालमधील वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांचे आंदोलन अद्यापही सुरु आहे. आंदोलनकर्त्यांच्या विरोधात राज्यात सत्ताधारी असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी आणि नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आंदोलनकर्ते ‘खाटिक’ असल्याच्या अश्लाघ्य वक्तव्य दोन दिवसांपूर्वी लव्हली मित्रा या महिला आमदाराने केले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. जनक्षोभ भडकल्यानंतर या आमदाराने क्षमायाचना करत वक्तव्य मागे घेतले.
चार दिवसांत तीन घटना
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचारांची तीन प्रकरणे घडली आहेत. यावरुन गुन्हेगारांना कायद्याचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा धाक वाटत नसल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली. तृणमूल काँग्रेसने गेल्या 13 वर्षांच्या सत्ताकाळात गुन्हेगारीसंबंधी बोटचेपे धोरण स्वीकारल्याने गुन्हेगारीत, विशेषत: महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून स्थिती राज्यसरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. राज्यातील महिला जीव मुठीत धरुन जगत असल्याची स्थिती आहे, असाही प्रहार या पक्षाने केला. केवळ नवे कायदे केल्याने प्रश्न सुटणार नसून कायदे लागू करणारी यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.