बांदा- दाणोली जिल्हामार्गावर गटारातील पाणी भर रस्त्यावर
दुचाकी वाहनचालकांसह शेतकरी व पादचाऱ्यांना फटका
ओटवणे । प्रतिनिधी
बांदा- दाणोली या जिल्हामार्गावरील बावळाट, सरमळे, विलवडे, वाफोली या गावातील जिल्हा मार्गाचे गटार मातीने बुजले असून ते न उपसल्याने गटारातील पाणी फार रस्त्यावरून वाहत आहे. याचा फटका दुचाकी वाहन चालकांसह पादचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन गटार उपसावेत आणि हा जिल्हा मार्ग वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी या मार्गावरील दुचाकी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
या महत्वाच्या जिल्हा मार्गावरील बावळाट, सरमळे, विलवडे, वाफोली या गावातील गटार न उपसल्याने ते मातीने भरले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारातील पाणी भर रस्त्यावरून वाहत आहे. याचा फटका वाहनचालंकासह सध्या शेतकरी वर्ग व पादचाऱ्यांना बसत आहे. भर रस्त्यावरून पाणी वाहत असुन सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे पाण्याचे फवारे या मार्गावरुन ये जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांसह शेतकरी वर्ग व पादचाऱ्यांवर बसतात. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडीही वाढल्याने याचा फटका वाहनचालकांसह पादचाऱ्यांना बसत आहे. सध्या या जिल्हा मार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू असुन याचाही फटका आंबोली आणि गोवा पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांसह वाहनचालकांना याचा बसत आहे. या जिल्हा मार्गाच्या अनेक ठिकाणच्या दयनिय अवस्थेमुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या हजारो पर्यटकांसह वाहन चालकांसाठी सध्या हा जिल्हा मार्ग डोकेदुखी ठरला आहे.दरम्यान वाहतुकीच्या दृष्टीने बांदा - दाणोली हा जिल्हा मार्ग महत्त्वाचा आहे. आंबोली आणि गोवा ही दोन्ही पर्यटन स्थळे कमी अंतरात जोडणारा हा मार्ग असून पावसाळ्यात या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच बांदा परिसरातून पुणे, कोल्हापूरसह बेळगाव येथे येण्या-जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे प्रवासासाठी या भागातील बहुतांशी वाहन चालक याच मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही अशी मागणी या मार्गावरील दुचाकी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.