मारुतीनगर येथील गटारीतील सांडपाणी रस्त्यावर
मनपाने तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी
वार्ताहर/सांबरा
बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मारुतीनगर येथे गटारीतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे गल्लीला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना राबवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये येथे नागरी वसाहत झपाट्याने वाढली आहे. येथे नवीन घरे बांधण्यात आली आहेत. त्यावेळी रस्ते व गटारींची निर्मिती करण्यात आली. मात्र येथे ड्रेनेज सिस्टीम नसल्याने गटारी भरून सांडपाणी चक्क रस्त्यावर साचले आहे. याच पाण्यातून विद्यार्थ्यांना व नागरिकांना यावे जावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर आणखीन परिस्थिती बिकट होणार आहे. यासाठी येथील समस्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे. याबाबत मनपा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून येथील पाण्याचा निचरा करावा व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.