स्पेनमध्ये वणव्यांचे भीषण संकट
70 हजार लोकांनी सोडले घर
माद्रिद : स्पेनची राजधानी माद्रिदच्या पश्चिम भागापर्यंत वणव्याचे संकट पोहोचले आहे. जोरदार वारे वाहत असल्याने तेथील स्थिती आणखी अवघड झाली आहे. तर वणव्यांमुळे आतापर्यंत 70 हजार लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे. या भागातील ही आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी सांगितले आहे. आमची प्राथमिकता, आमचा विचार आणि उद्देश लोकांचा जीव वाचविणे आणि नागरी भागांची सुरक्षा करणे आहे. आगामी काही दिवस अवघड ठरू शकतात, कारण तापमान कमी झाले असले तरीही वाऱ्यांची दिशा कशी राहिल हे आम्हाला अचूकपणे ठाऊक नाही असे उद्गार सांचेज यांनी वणवाप्रभावित भागातील सेािनिसीएंटोस गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले आहेत. वणव्याच्या संकटामुळे ब्रुनेट शहरातील रहिवासी अत्यंत चिंतेत आहेत. दरवर्षी येथे आगीचे संकट निर्माण होत असते, परंतु यावेळची आग अत्यंत भयानक वाटत असून यामुळे आतापर्यंत प्रचंड नुकसान झाल्याचे ब्रुनेट शहराच्या महापौर मार निकोलस यांनी म्हटले आहे. माद्रिद शहराच्या पश्चिम भागातील आकाश दाट धूराने झाकोळले गेले असून आगीचा प्रभाव मध्य माद्रिदच्या रस्त्यांवरही दिसून येत आहे. तेथील लोकांना आगीच्या धूरामुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य मंत्रालयाने हवेच्या खराब गुणवत्तेमुळे दीर्घकाळापर्यंत बाहेर राहू नका असा सल्ला सोशल मीडियावर पोस्ट करत दिला आहे. तर आगीमुळे प्रभावित गावांमधील लोकांना राजधानी माद्रिदच्या आसपास निर्मित स्पोर्ट्स हॉलमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.