Pratapgad : प्रतापगड रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा फटका
प्रतापगडकडे जाणारा मार्ग ठरला ‘ट्रॅफिक जाळं’
प्रतापगड : पर्यटन हंगाम सुरू असतानाच प्रतापगड रस्त्यावर निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. शालेय सहलीच्या बस, खासगी वाहने आणि दुचाकी यांचा बेधुंद ओघ एकाच अरुंद रस्त्यावर सोडल्याने वाहनांच्या रांगा मैलोनमैल पसरल्या. अनेक ठिकाणी वाहने तासन् तास अडकून पडली, नागरिकांना नाईलाजाने पायपीट करावी लागली. पर्यटकांचा सुट्टीचा मौल्यवान वेळ वात्हतूक कोंडीमध्ये वाया गेला. यामुळे पर्यटकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पर्यटनासाठी देशभरात ओळख असलेल्या या मार्गावर गर्दी वाढणार हे माहित असतानाही प्रशासनाने कोणतेही पूर्वनियोजन केलेले दिसत नाही. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नव्हता. परिणामी, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि 'जसे येईल तसे' वाहनचालक आपली वाहने कोंबण्याचा प्रयत्न करत राहिले. अरुंद रस्त्यावर शालेय बस उभ्या राहिल्याने कोंडी अधिकच गंभीर बनली.
तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था, शालेय सहलींच्या बससाठी तसेच गर्दीच्या ठिकाणी किमान दोन-तीन वाहतूक पोलिसांची नियुक्ती हे अगदी मूलभूत उपाय असूनही ते राबवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. या निष्काळजीपणाचा फटका नागरिक, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना बसत असताना प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना बॅगांचे ओझे हातात घेत चालत मार्ग काढावा लागला.