किनारपट्टीवरील जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा
बेंगळूर : राज्यात उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढत असून, हवामान विभागाने किनारपट्टी आणि अंतर्गत जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. कारवार, उडुपी आणि मंगळूर या किनारपट्टीवरील जिल्ह्यांतील उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून मलनाड आणि राज्याच्या उत्तरेकडील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याचे अनुमान आहे. राज्याची राजधानी बेंगळूरसह उर्वरित भागांमध्ये पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होईल. कल्याण कर्नाटक भागातील काही जिल्ह्यांत येत्या काही दिवसांत तापमान 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून 2026 या कालावधीत देशभरात सर्वाधिक तापमानाची नोंद होईल. ओडिशा, बंगाल आणि कर्नाटकच्या अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त उष्मा नोंद येईल. याचा जलस्रोत व विजेच्या मागणीवर गंभीर परिणाम होईल. कलबुर्गी आणि विजापूर जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे. कोडगू, हासन, चिक्कमंगळूर आणि शिमोगा या दक्षिणेकडील जिल्ह्यांतही पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उन्हापासून संरक्षणासाठी...
उन्हाच्या तीव्रतेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उन्हात जाणे टाळावे. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी, नारळपाणी किंवा ताक प्यावे. कॉफी, चहा आणि साखरयुक्त पेये टाळावीत. बाहेर जाताना फिकट रंगाचे सुती कपडे घालावेत. छत्री किंवा टोपीचा वापर करावा, असा सल्ला आरोग्य खात्याने दिला आहे.