आंध्र, तेलंगणात भीषण पूर
22 जणांचा मृत्यू : 86 रेल्वेफऱ्या रद्द : 70 रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हिमाचल प्रदेश, आसाम आणि गुजरातनंतर पूर आणि अतिवृष्टीने आंध्रप्रदेश तसेच तेलंगणात मोठे संकटत निर्माण केले आहे. दोन्ही राज्यांमध्ये पाऊस आणि पूराशी संबंधित दुर्घटनांमध्ये कमीतकमी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांमधील अनेक शहरांमध्ये रस्ते आणि वसाहती पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात तरंगत असताना दिसून आली आहेत. रेल्वेमार्गांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत स्थिती जाणून घेतली आहे. तसेच केंद्राच्या वतीने शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तेलंगणात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. यामुळे खम्माम जिल्ह्यातील पलेयर जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे. मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांनी एकीकृत कमांड नियंत्रण केंद्राला भेट देत मदतकार्यांची स्थिती तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीवर समीक्षा बैठक घेतली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे हैदराबाद येथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तेलंगणातील अतिवृष्टीमुळे केसमुद्रम आणि महबूबाबाद दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे नुकसान झाले आहे. रेल्वेमार्गाखाली माती वाहून गेली आहे. यामुळे रेल्वेने 86 रेल्वेफेऱ्या रद्द केल्या असून 70 रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले आहेत.
लोकांच्या घरात शिरले पाणी
आंध्रप्रदेशात विजयवाडा आणि अमरावती येथे पूरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तेथील लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. आंध्रप्रदेशात विजयवाडा-विशाखापट्टणम, विशाखापट्टणम-गुंटूर, रायगढ-गुंटूर, विजयवाडा-राजमुंदरी या मार्गांवरील रेल्वेफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी रात्री विजयवाडा येथे वास्तव्य करत स्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. यानंतर सोमवारी त्यांनी सर्वाधिक पूरग्रस्त अजित सिंह नगर भागाचा दौरा केला आहे. विजयवाडा, गुंटूर आणि अन्य शहरांमध्ये शनिवारपासून अतिवृष्टी होत आहे. पूर आणि पावसामुळे राज्यात 12 जणांना जीव गमवावा लागला आहे.