अनेक राज्यांमध्ये गंभीर पूरसंकट
दिल्ली-एनसीआरमध्ये पूर, नोएडाचा बराच भाग पाण्याखाली : अनेक नद्यांना पूर, धरणेही तुडुंब
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात पूर आणि पावसाने हाहाकार माजवला आहे. बहुतेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंजाबमधील सतलज, बियास आणि रावी या प्रमुख नद्या पूरमय झाल्या आहेत. नद्यांची पाणीपातळी वाढल्याने पूरस्थिती गंभीर बनली आहे. डोंगराळ राज्यांपासून ते मैदानी भागात पावसाने कहर केला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सततच्या पावसामुळे यमुना नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत असल्यामुळे अनेक भागात पुराची पाणी शिरले आहे. नोएडातील सेक्टर-135 आणि सेक्टर-151 पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागात 3 ते 4 फूट पाण्याने भरले आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वाढत्या नद्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार, भारतातील 24 नद्यांमध्ये गंभीर पूरस्थिती आहे, तर इतर 33 नद्यांची पाण्याची पातळी सामान्यपेक्षा जास्त आहे. बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे.
हरियाणाच्या पंचकुला, हिसार, रोहतक, झज्जर, फतेहाबाद, कुरुक्षेत्र, यमुनानगर आणि फरिदाबादमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये पुरात मृतांचा आकडा गुरुवारी 43 वर पोहोचला. राज्यातील 23 जिह्यांतील 1,655 गावांमध्ये 3.55 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. 1.71 लाख हेक्टर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा इशारा नसल्यामुळे पुरापासून दिलासा मिळू शकतो.
भाविक-पर्यटकांना फटका
हिमाचल प्रदेशातील चंबा जिह्यातील भरमौर येथे 11 दिवसांपासून अडकलेल्या 50 मणिमहेश भाविकांना शुक्रवारी सकाळी हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने चंबा येथे आणण्यात आले. चंबा येथील सर्व भाविकांना सरकारी बसेसमधून पठाणकोटला पाठवण्यात आले. देशभरातील 400 हून अधिक भाविक अजूनही भरमौरमध्ये अडकले आहेत. 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान भरमौरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळे यात्रेकरू अडकले होते. य दरम्यान 11 भाविकांचा मृत्यूही झाला. त्यापैकी 3 जण पंजाबचे, 5 जण चंबा येथील, 1 जण उत्तर प्रदेशातील होते. 2 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
राजस्थानमधील अजमेर येथे गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बोराज तलावाचा बांध कोसळल्यामुळे 1 हजाराहून अधिक घरांमध्ये अचानक पाणी घुसले. लोकांनी छतावर जाऊन आपले प्राण वाचवले. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की अनेक वाहनेही वाहून गेली. तसेच घरांचे आणि शेती-भातीचेही नुकसान झाले. लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
गुजरातमध्ये नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. नर्मदेची पाण्याची पातळी 135.94 मीटरवर पोहोचली आहे. या हंगामात पहिल्यांदाच धरणाचे 23 दरवाजे 2.50 मीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत. सध्या धरण ओव्हरफ्लोपासून 2.74 मीटर दूर आहे. गेल्या 24 तासांत धरणाची पाण्याची पातळी 40 सेंटीमीटरने वाढली आहे. 27 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.