जतजवळ भीषण अपघात, चुलत भावांचा मृत्यू
जत :
जत सांगोला मार्गावर सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघां सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघेही जत तालुक्यातील शेगाव गावचे रहिवाशी आहेत. हा अपघात इतका गंभीर होता की, समोरच्या टेम्पोची दुचाकीला धडक बसताच दुचाकी चक्काचूर झाली. तर टेम्पोचेही नुकसान झाले. यात देवदत्त दिलीप शिंदे (20) व यशराज नानासो शिंदे (14) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने शेगावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी टेम्पो चालक विशाल रघुनाथ नलवडे (रा. टाकळी जि. अहिल्यानगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहीती अशी, सोमवारी सकाळी शेगाव येथील देवदत्त शिंदे व यशराज शिंदे हे चुलत भाऊदुचाकीवरून जत शहरात आले होते. येथील काम आटोपून ते पुन्हा शेगावच्या दिशेने जात होते. याचवेळी शेगावकडून येणारा टेम्पो (एम. एच. 12. एफ. सी. 8260) यांच्यात जतजवळ एका कापड दुकानासमोर समोरासमोर जोराची धडक झाली. टेम्पो चालकाने गाडीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही दुचाकीला तो वाचवू शकला नाही. या धडकेत यशराज व देवदत्त या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघात इतका भीषण झाली की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दुचाकी थेट टेम्पोत घुसल्याने तीचा चक्काचूर झाली. या अपघाताची माहिती मिळताच जत पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने जत ग्रामीण रूग्णालयात आणले. परंतू तोवर दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी जत पोलिसांत टेम्पो चालक विशाल नलवडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
- शेगावात शोककळा
शेगावच्या शिंदे कुटुंबियावर सोमवारी सकाळी काळाने घाला घातल्याची बातमी समजताच गावात शोककळा पसरली. हे कुटुंबिय अतिशय गरीब असून यातील देवदत्त शिंदे हा चारचाकी वाहनांवर चालक म्हणून काम करत होता. महिन्या भरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तर यशराज हा येथील विजयसिंह डफळे हायस्कुलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. यशराज सोमवारी शाळेत पेपरसाठी गेला होता. पेपर देवून तो थेट आपल्या भावासोबत दुचाकीवरून जतला गेला अन् येताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.