For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंचाहत्तर टक्के भारत भूकंपप्रवण क्षेत्रात देशाचा ‘भूकंप नकाशा’

06:15 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
पंचाहत्तर टक्के भारत भूकंपप्रवण क्षेत्रात देशाचा ‘भूकंप नकाशा’
Advertisement

प्रसिद्ध, योजना आवश्यक

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचा नूतनीकृत ‘भूकंप नकाशा’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नकाशानुसार आता भारताची 75 टक्के लोकसंख्या भूकंपप्रवण क्षेत्रात येत आहे. सर्वाधिक भूकंपस्थिती हिमालयीन भागात आहे. ही पर्वतरांग सर्वाधिक धोक्याच्या साहव्या क्षेत्रात प्रथमच दर्शविण्यात आली आहे. भूकंपाच्या संभाव्य संकटाच्या निराकरणासाठी व्यापक योजनेची आणि नियोजनाची आवश्यकता आहे, असे दिसून येत असून प्रशासनावरील उत्तरदायित्वात यामुळे मोठी वाढ होणार आहे.

Advertisement

या नव्या नकाशामुळे भारताची भूकंपस्थिती अधिक गंभीर झाल्याचे आढळून येत आहे. भारताच्या कोणत्या भागाला भूकंपाचा धोका किती आहे, हे या नव्या नकाशात स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आता देशाचा 60 टक्के भाग, तर लोकसंख्येच्या दृष्टीने 75 टक्के लोकसंख्या भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याचे या नकाशात स्पष्ट करण्यात आले आहे, असे दिसून येत आहे.

हिमालयाच्या धोक्यात वाढ

भारताच्या हिमालय पर्वतरांगा नेहमीच तीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात असतात. तथापि, काही दशकांपूर्वी हे क्षेत्र चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या, अर्थात, सध्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपस्थितीत होते. पण आता या क्षेत्राला साहव्या सर्वात तीव्र भूकंपस्थितीत समाविष्ट करण्यात आल्याने हिमालयाला असणारा भूकंपाचा धोका अधिकच वाढला असल्याचे आढळत आहे. पूर्वीच्या नकाशानुसार हिमालय क्षेत्र तुकड्या तुकड्यांच्या स्वरुपात भूकंपस्थिती असल्याचे दिसत होते. पण आता या संपूर्ण क्षेत्राचा सलगपणे समावेश सर्वोच्च तीव्रतेच्या क्षेत्रात करण्यात आला आहे.

हिमालय सर्वाधिक संकटात का...

भारतवर्षाचा भूप्रस्तर (टेक्टॉनिक प्लेट) ज्या सीमारेषेवर युरेशियाच्या भूप्रस्तराला आदळला आहे, त्याच सीमारेषेवर हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. दोन भूप्रस्तरांच्या या एकमेकांशी आदळण्यातूनच हिमालय पर्वतरांगांची निर्मिती झाली आहे. हे दोन भू-प्रस्तर आजही एकमेकांना रेटत असून त्यामुळे या भागात भूमीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात भूकंप हालचाली सातत्याने होत असतात. त्यामुळे हा भाग सर्वाधिक तीव्रतेच्या भूकंपस्थितीत असतो. ही स्थिती अधिकच तीव्र झाली आहे.

अनेक घर्षणबिंदू

हिमालयाच्या खाली भूमीच्या गर्भात या दोन भू-प्रस्तरांमधील प्रचंड खडक आजही एकमेकांशी जुळवून घेण्याच्या हालचाली करीत आहेत. त्यामुळे हा भूगर्भातील भाग स्थिरावलेला नाही. म्हणून येथे भूकंपाचा धोका अधिक असल्याचे तज्ञांचे मत आहे. या हा भाग काश्मीपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतचा आहे. या भागात लोकसंख्याही दाट आहे. याच पट्ट्यात भूगर्भात अनेक खडक घर्षणबिंदू आहेत. त्यामुळे भूकंप होण्याची शक्यताही अन्य क्षेत्रांच्या तुलनेत अधिक आहे.

पायथ्याशी लोकवस्ती अधिक

हिमालयाच्या बाह्या रांगांच्या पायथ्याशी लोकवस्ती अधिक आहे. येथे नगरे, इमारती, सेतू, धरणे, ओव्हर ब्रिज आदी बांधकामेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना मोठ्या भूकंपाचा धोका अधिक आहे. देशाच्या इतर भागांमध्येही कमी अधिक प्रमाणात भूकंपस्थिती आहेच. पण हिमालयाच्या दक्षिणेच्या दिशेने पुढे गेल्यास ही स्थितीची तीव्रता कमी कमी होत जाते, असे या नव्या नकाशावरुन दिसून येते. दक्षिण भारतातही काही भूकंपबिंदू सक्रीय असल्याचे आढळून येत आहे.

उपाय काय आहे...

भूकंपाचा धोका टाळला जाऊ शकत नाही. तथापि, भूकंपस्थिती लक्षात घेऊन इमारती, सेतू, धरणे आणि इतर मोठी बांधकामे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास धोका बराचसा कमी करता येतो. त्यामुळे इमारती आणि इतर बांधकामांना अनुमती देताना ती भूकंपविरोधी आहेत की नाही हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे.

बांधकामे करताना दक्षता आवश्यक

ड भूकंपप्रवण क्षेत्रात बांधकामे करताना भूकंपविरोधी संरचना करणे आवश्यक

ड हिमालयाच्या पायथ्याच्या क्षेत्रात भूकंपाचा धोका सर्वाधिक, दक्षता आवश्यक

ड दक्षिण भारतात भूकंपधोका कमी असला, तरीही उपाययोजनेची आवश्यकता

ड स्थानिक प्रशासने, आपत्तीनिवारण यंत्रणांना दक्ष स्थितीत ठेवणे अतिआवश्यक

Advertisement
Tags :

.