सप्त स्वर...1
स्वर्गात एक सुंदर देवसभा सुरू होती. सर्वजण आपापल्या जागी स्थिरस्थावर झाले होते. या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी देवाने खास संगीत सभेचे आयोजन केलं होतं. यक्ष गंधर्व आपापल्या कला सादर करत होते. विविध वाद्य सादर करून दाखवत होते, वाजवत होते. त्यामुळे सर्वत्र स्वर्गीय आनंद भरून राहिला होता. अर्थातच या स्वरांचे प्रतिध्वनी पृथ्वीपर्यंत पोहोचतच होते. या सगळ्या नादमधूर संगीतानी चारही दिशा भारावून गेल्या होत्या. पण पृथ्वीवरचे प्राणी पक्षी मात्र हिरमुसले होते. त्याच्या पैकी कोणालाच आवाज मिळालेला नव्हता. त्यांना वाटलं हे असं काहीतरी आपल्यालाही मिळालं तर आपणही दुसऱ्यांसाठी काहीतरी आनंद निर्माण करू शकू. त्यांनी प्रत्येकानी चोच उघडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बोलताच येत नव्हतं. शेवटी सगळ्यांनी डोळ्यात पाणी आणून देवाला विनंती केली, की आम्हालाही असं सुंदर काहीतरी दे, की ज्याच्यामुळे आम्हाला हे जग सुंदर करता येईल. देवाने खूप विचार केला आणि ह्या सात स्वरांचे वाटप प्राणी पक्षांमध्ये करायला सुरुवात केली. पण ते देताना देवाने मात्र त्यांना अट घातली, मी तुम्हाला या संगीतातलं काही न काहीतरी देणार आहे, पण ते प्रत्येकाने योग्यवेळी योग्य प्रमाणात वापरलं तर कोणत्याही प्रकारचा अतिरेक होणार नाही. आणि काहीतरी विचित्र निर्माण होणार नाही. हा जणू एकाक्षरी मंत्रच देवाने त्यांना दिला. ज्याची साधना त्यांनी आयुष्यभर करायची होती आणि दुसऱ्यांसाठी आनंद निर्माण करायचा होता. सगळ्यात आधी मोर तिथेच जवळ असल्याने, देवाने मोराला बोलावलं आणि त्याला षड्ज हा स्वर दिला. त्याचं पीयू पीयू हा स्वर किंवा गायन ऐकण्यासाठी सगळे लोक अगदी जीवाचा कान करून ऐकायचे. हातातलं काम टाकून मोराला बघायला यायचे. आकाशातले मेघ आनंदाने पावसाचा वर्षाव करायचे. पण यासाठी मनाच्या तगमगी नंतरच तृप्ती मिळायची. सर्वत्र आनंद निर्माण करायची ताकद या स्वरामध्ये होती. पण एक दिवस सगळे मोर एकत्र येऊन सराव करायला लागले. तेव्हा मात्र हा स्वर नकोसा वाटायला लागला आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की देवाने जे सांगितलंय तसंच आपण वागायला हवं. जेव्हा हा मोर एकटाच उन्हाळ्यानंतर हा स्वर आळवतो त्या वेळेला खऱ्या अर्थाने हा स्वर ब्रम्हांडापर्यंत पोहोचतो आणि मग मल्हाराचे मेघ बरसतात.
आता दुसरा स्वर कुणाला द्यावा? अशा विचारत असतांनाच देवाच्या पायाशी अनेक शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या येऊन थांबल्या. देवाने त्यांना गांधार हा स्वर दिला. आपल्याला एकट्यालाच बोलता येतं या आनंदात सगळ्या मेंढ्या बकऱ्या एकमेकांना सांगू लागल्या. मला बोलता येते, मला बोलता येते. त्यांच्या बोलण्यात वागण्यात सारखा मी पणा असल्यामुळे आता त्यांच्या त्या गांधारातून में, में असा स्वर ऐकू येऊ लागला. जिथे मी पणाची बाधा होते त्यांना लवकर मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. त्यांच्या ह्या ओरडण्यानेच अनेक बकऱ्या शेळ्यांना शत्रू निर्माण झाले. त्यांच्यासाठी आवाज शाप ठरला.