For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माशेलात गुंडागर्दी करणाऱ्या सातजणांना अटक

11:46 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
माशेलात गुंडागर्दी करणाऱ्या सातजणांना अटक
Advertisement

विराज माशेलकर मारहाणप्रकरण : मुख्य संशयित समीर फडतेही गजाआड

Advertisement

फोंडा : माशेल येथील ‘टमी ट्रिट’ फास्ट फूड सेंटरचे मालक विराज माशेलकर यांना खाकीचा धाक दाखवित बेदम मारहाणप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी काल मंगळवारी सातजणांना अटक केली आहे. माशेलकर यांच्यावर जीवघेणा हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रथमदर्शनी 9 जणांवर गुन्हा नोंदविला होता. या घटनेनंतर मुख्य संशयित पोलीस हवालदार समीर फडते व त्याचे साथीदार फरार झाले होते. त्यापैकी सातजणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. खाकीचा धाक दाखवित समीरने आपल्या अन्य 7 जणांच्या साथीने खाकीतील ही  गुंडागर्दी रविवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केली होती. पोलीस कॉन्स्टेबल आकाश नावेलकर हा म्हार्दोळ पोलिसांच्या हाती लागला होता.

चौकशीनंतर सातजणांना अटक

Advertisement

आकाश नावेलकर याची म्हार्दोळ पोलीसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर काल मंगळवारी मुंख्य संशयित समीर फडते (42, बेतकी) याच्यासह मितेश गाड (नावेली, आयआरबी पोलीस), सुप्रेश सावर्डेकर (हरवळे), मोहीत गाड (नावेली, टॅक्सीचालक) अस्मित साळूंके (आमोणे), विवेक देसाई (सांखळी), यतीराज कामत (डिचोली) या सात संशयिताना म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हार्दोळ पोलीस अधिक तपास करीत आहे.

विराजचे यश पाहवत नसे

समीर फडते हा विराजच्या फास्ट फूड व्यवसायातील बिझनेस पार्टनर होता.  समीर, समीरची पत्नी व विराज यांनी मिळून हा फास्ट फुडचा व्यवसाय थाटला होता. कोविडकाळात विराज याची नोकरी सुटल्याने त्याने पूर्णवेळ फास्ट फूडच्या व्यवसायात लक्ष घातले. पुढे सहाय्यक म्हणून असलेल्या समीरच्या पत्नीला त्याने या व्यवसायातून फारकत घ्यायला सांगितले. त्यानंतर विराज हा पूर्णवेळ व्यवसायात रमला होता. व्यवसाय तेजीत असल्याने बऱ्यापैकी कमवित होता, हे समीर फडते याला पाहवत नसे, म्हणून त्याने आपल्यावर हल्ला केला, असे विराजने पोलिसांना सांगितले होते, त्यानुसार पोलिसांनी तपास केला.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाले सर्वजण

समीर फडते आपण पोलीस असल्याने विराजला सतत त्रास देत होता. विनाकारण पोलिसात तक्रारी देत होता. फास्ट फूड सेंटर ब्बंद पाडण्याचे प्रयत्नही त्याने केले होते. कैकवेळा फोंडा व म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रारी करून प्रकरण मिटवण्यात येत असे. परंतू त्यानंतर सतर्क झालेल्या विराजने आपल्या आस्थापनात हाय रेझ्युलेशन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले होते. समीर पोलीसी खाकीचा वापर करुन भांडण करणार आणि तो एक दिवस तावडीत सापडणार हे विराज याला पक्के ठाऊक होते. म्हणून त्याने जे सीसी टिव्ही कॉमेरे बसविले, त्यातच समीर व अन्य विराजला मारहाण करत असल्याचे रेकॉर्ड झाले. त्यामुळे पोलिसांना सर्वांना अटक करणे शक्य झाले.

Advertisement
Tags :

.