For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्युरँड कप स्पर्धेत सात नवीन संघांचा सहभाग

06:08 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ड्युरँड कप स्पर्धेत सात नवीन संघांचा सहभाग
Advertisement

देशाच्या पाच शहरांमध्ये आयोजन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची प्रतिष्ठित ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धा आता विस्तारित स्वरूपात आयोजित केली जाणार आहे. यामध्ये 24 संघ सहभागी होणार असून पाच शहरांमध्ये सामने खेळवले जातील, ज्यामुळे फुटबॉलप्रेमींसाठी हा हंगाम रोमांचक ठरणार आहे.

Advertisement

यावर्षीच्या स्पर्धेत सात नवीन संघांसह एकूण 24 संघ सहभागी होत आहेत आणि 25 जुलै ते 23 ऑगस्ट या कालावधीत पाच शहरांमध्ये सामने होणार आहेत. स्पर्धेची सुरुवात 25 जुलै रोजी कोलकाता येथे होईल आणि त्यानंतर पुढील चार आठवड्यांत रांची, इम्फाळ, शिलाँग व गुवाहाटी येथे सामने खेळवले जातील. अंतिम सामना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे होणार आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा इंडियन सुपर लीग क्लब, आय-लीग संघ, सर्व्हिसेसचे संघ, उदयोन्मुख स्थानिक संघ आणि परदेशी संघ आमनेसामने येतील.

विस्तारित स्वरूप आणि नवीन सहभागी संघ

सात नवीन संघांमध्ये श्रीलंकेच्या सशस्त्र दलांचा ‘डिफेंडर्स एफसी‘ आणि मेघालय प्रीमियर लीगचे विजेते ‘नोंगसेह स्पोर्ट्स, सोशल अँड कल्चरल क्लब‘  यांचा समावेश आहे. कोलकाता पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य केंद्र असेल. येथे विवेकानंद युवा भारती क्रीडांगण आणि किशोर भारती क्रीडांगण यांवर दोन गट, सलामीचा सामना, दोन उपांत्यपूर्व सामने, एक उपांत्य सामना आणि अंतिम सामना खेळवला जाईल. हे शहर विक्रमी 17 वेळा विजेतेपद पटकावणारा मोहन बागान सुपर जायंट 16 वेळा विजेता ठरलेला ‘ईस्ट बंगाल एफसी‘, तसेच ‘मोहम्मडन एससी‘, ‘साउथ युनायटेड एफसी‘, ‘सीआयएसएफ, ‘भारतीय सेना‘ आणि नवीन संघ ‘बागपत एफसी‘ व ‘समालेश्वरी स्पोर्टिंग‘ यांचे यजमानपद भूषवेल.यजमान शहरे आणि सहभागी संघ रांची पहिल्यांदाच ड्युरँड चषकाचे यजमानपद भूषवणार आहे. येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर 26 जुलै ते 16 ऑगस्ट या काळात साखळी सामने आणि एक उपांत्यपूर्व सामना खेळवला जाईल. हे शहर ‘जमशेदपूर एफसी‘, ‘स्पोर्टिंग क्लब दिल्ली‘, ‘भारतीय वायुसेना‘ आणि नवीन संघ ‘डिफेंडर्स एफसी‘ यांचे यजमानपद करेल. इम्फाळमधील खुमान लॅम्पॅक स्टेडियमवर 28 जुलै ते 17 ऑगस्ट दरम्यान साखळी सामने आणि एक उपांत्यपूर्व सामना खेळवला जाईल. या गटात स्थानिक क्लब ‘टीआरएयू एफसी‘ आणि ‘नेरोका एफसी, ‘भारतीय नौदल‘ आणि नवीन संघ ‘एफसी रांगदाई‘ यांचा समावेश आहे.

शिलाँगच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 31 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान साखळी सामने होतील आणि त्यानंतर येथे एक उपांत्य सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत शिलाँग लाजोंग एफसी, नोंगक्सेह एसएस अँड सीसी, लँगसिंग एफसी आणि पदार्पण करणारा संघ ‘मुंबई एफसी‘ यांचा सहभागी असेल.

गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियमवर 1 ते 13 ऑगस्ट या कालावधीत साखळी फेरीतील सामने खेळवले जातील. गतविजेता संघ ‘नॉर्थईस्ट युनायटेड एफसी‘ या गटाचे नेतृत्व करेल. त्यांच्यासोबत एफसी 1, बोडोलँड एफसी आणि कार्बी आंगलाँग मॉर्निंग स्टार एफसी हे संघ असतील.

Advertisement
Tags :

.