जम्मू-काश्मीर हल्ल्यात सात ठार
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका डॉक्टरसह 7 जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये तीन बिहारी मजुरांचाही समावेश आहे. हे मजूर एका बोगद्याच्या प्रकल्पात काम करीत होते. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानात कार्यरत असलेल्या एका दहशतवादी गटाने स्वीकारली असून तसा संदेश या गटाकडून देण्यात आल्याने त्या दिशेने तपास होत आहे.
रविवारी या हल्ल्यात 2 जणांचा बळी गेल्याचे वृत्त देण्यात आले होते. तथापि सोमवारी या हल्ल्यातील आणखी काही गंभीर जखमी झालेल्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 7 वर पोहचली. याप्रकरणी जम्मू-काश्मीरचे पोलीस तपास करीत आहेत. हा हल्ला टीआरएफ या गटाने केला असून हा गट लष्कर-ए-तोयबा या मुख्य दहशतवादी संघटनेची एक शाखा असल्याची माहिती देण्यात आली.
गुल हा प्रमुख सूत्रधार
श्रीनगर येथे वास्तव्यास असणारा शेख सज्जाद गुल हा या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्याला पाकिस्तानमध्येच दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाले आहे. या गटाने प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरी आणि बिगर काश्मीरी नागरिकांवर हल्ला केला असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. गुल हा गेली पाच वर्षे या भागात कार्यरत आहे.
10 लाखांचे इनाम
सज्जाद गुल व त्याचे सलीम रहमानी आणि सैफुल्ला सईद हे दोन साहाय्यक यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास 10 लाख रुपयांचे इनाम एनआयएने 2 वर्षांपूर्वी घोषित केले होते. गुल याचे हे साहाय्यक पाकिस्तानी नागरिक आहेत. बसीत अहमद हा तिसरा साहाय्यक जम्मू-काश्मीरमधील कुलगामचा रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या संघटनेने या भागात उच्छाद मांडला असून काश्मीरी पंडित, बिगरकाश्मीरी नागरीक आणि इतर नागरिकांच्या हत्या केल्या आहेत.
रेकी करून हल्ला
दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी या भागाचे निरीक्षण केले होते. त्यानंतर त्यांनी हल्ल्याची जागा ठरविली. या हल्ल्यात ठार झालेले बहुतेक लोक कामगार होते. सीमावर्ती भागांमध्ये सध्या बोगदे निर्माण करण्याचे काम होत आहे. या कामावर ते मजूर म्हणून कामाला होते. बिहारचे तीन मजूरही यात समाविष्ट होते.
दुसरा हल्ला
गेल्या पाच दिवसांमधील हा या भागात झालेला दुसरा हल्ला आहे. यापूर्वी एका बिहारी मजुराची हत्या दहशतवाद्यांकडून करण्यात आली होती. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक नुकतीच घेण्यात आली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला काँग्रेससह बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीनंतर अशा हल्ल्यांच्या प्रमाणात आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राजकीय पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून प्रदेशात शांतता निर्माण करण्यासाठी यापुढे आणखी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. हा भ्याड हल्ला असून असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. दोषींना कठोर शासन करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा हल्ला निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाने हा हल्ला म्हणजे भारताविरोधात व्यापक कट असल्याचा आरोप केला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्वरित या हल्ल्याच्या सूत्रधारांना अटक करुन त्यांच्यावर अभियोग चालवावा, अशी मागणी प्रदेशाच्या नवनिर्वाचित सरकारकडे केली आहे.