For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूरनजीक भीषण अपघातात सात ठार

06:52 AM Feb 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूरनजीक भीषण अपघातात सात ठार
Advertisement

कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह कँटरला धडक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कार, दुचाकी आणि कँटरमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. एकजण जखमी झाला आहे. होस्कोटे-दाबसपेठेदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये कारमधील सहा जणांसह दुचाकीस्वाराचा समावेश आहे. अश्विन नायर (वय 17, रा. कोत्तनूर), इंथन जॉर्ज (वय 17, रा. हुळीमावू), अहराम शरिफ (वय 16, रा. उगीख लेआऊट), अयान अली (वय 17, रा. कोत्तनूर), भरत (वय 17, रा. फ्रेजर टाऊन), फरहान (वय 18, रा. कम्मनळ्ळी) आणि गगन (वय 26, रा. देवनायकनहळ्ळी, दुचाकीस्वार) अशी मृतांची नावे आहेत. बालसुब्रमण्य (वय 32, कँटरचालक) असे जखमीचे नाव आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी, एचबीआर लेआउट, फ्रेझर टाऊन, हेण्णूर आणि कोत्तनूरच्या आसपासच्या भागात राहणारे हे सर्वजण एसएसएलसी आणि पीयूसीचे शिक्षण घेत होते. ते सर्वजण गुरुवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडून लाँगड्राईव्हसाठी कारने निघाले. एसयूव्ही कार पहाटे 4.30 वाजता होस्कोटे-दाबसपेठेदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर होस्कोटेहून देवनहळ्ळीकडे जात असताना सुलिबेले पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या एम. सत्यवार गावाजवळ पुढे जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटून कँटरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वारासह कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सुलिबेले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सात जणांचे मृतदेह विच्छेदनासाठी होस्कोटे सरकारी ऊग्णालयात पाठवण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वेगामुळे एसयूव्ही कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रथम एका दुचाकीला आणि नंतर कँटरला धडक दिली. दरम्यान, एसयूव्हीमधील सहा जण आणि दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनास्थळी आयजी लाभूराम, एसपी चंद्रकांत, डीवायएसपी मल्लेश यांच्यासह सुलिबेले पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या अपघातानंतर महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

Advertisement
Tags :

.