सात इस्रायली सैनिक गाझामध्ये हल्ल्यात ठार
वृत्तसंस्था/ गाझा
गाझामध्ये बुधवारी एका लष्करी वाहनाला टार्गेट करून करण्यात आलेल्या स्फोटात सात इस्रायली सैनिक ठार झाले. याचदरम्यान हमासच्या सैनिकांनी दक्षिण गाझामधील एका इमारतीत लपलेल्या इस्रायली सैनिकांवर हल्ला केला. दक्षिण गाझा शहर खान युनूसमध्ये एका चिलखती वाहनात स्फोट होऊन सात इस्रायली सैनिक ठार झाल्याचे एका इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी, गोळीबारात एक सैनिक गंभीर जखमी झाला. गाझामधील इस्रायली सैन्यावर झालेला हा मोठा हल्ला होता.
इस्रायल आणि हमासमधील संघर्ष सुरू होऊन जवळजवळ 21 महिने झाले आहेत. या दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात इस्रायलने गाझामध्ये भयानक विनाश घडवून आणला आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासशी युद्ध सुरू झाल्यापासून 860 हून अधिक इस्रायली सैनिक मारले गेले आहेत. यापैकी गाझामधील लढाईत 400 हून अधिक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.