गोव्यात सात दिवसांचा दुखवटा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून शोक व्यक्त
प्रतिनिधी/ पणजी
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे गोवा सरकारने 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. दि. 26 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत हा दुखवटा राहणार आहे.
सार्वजनिक प्रशासन खात्याने त्यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात, दिवंगत मान्यवरांच्या सन्मानार्थ आणि भारत सरकारच्या निर्णयानुसार दि. 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधित सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येईल, असे म्हटले आहे.
दुखवट्याच्या या कालावधित राज्यात राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकविण्यात येत असलेल्या प्रत्येक ठिकाणी तो अर्ध्यावर फडकविण्यात येणार आहे. तसेच या कालावधित अधिकृत मनोरंजनाचे कोणतेही कार्यक्रम होणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सिंग यांचे योगदान अतुलनीय : मुख्यमंत्री
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या विकासात दिलेले अतुलनीय योगदान नेहमीच कृतज्ञता आणि आदरपूर्वक स्मरणात राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डॉ. सिंग यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी डॉ. सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अतिव दु:ख झाल्याचे म्हटले आहे. डॉ. सिंग यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात खुल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताच्या परिवर्तनीय प्रवासात महत्वाची भूमिका बजावल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करताना डॉ. सिंग यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
सिंग यांचे गोव्यासाठी योगदान : राणे
भारताने एक महान अर्थतज्ञ, प्रशासक गमावला आहे. या महान व्यक्तीला आपण मुकलो आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही डॉ. सिंग यांच्याकडे गेलो, त्या प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला अर्थविषयक समस्या सोडविण्यात महत्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी सूचविलेल्या सुधारणांमुळे आम्हाला आर्थिकदृष्ट्या व अतिशय कल्याणकारी पद्धतीने पुढे जाण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केली.