सात दिवसांच्या घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स 628 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था, मुंबई
गेल्या सात सत्रांमध्ये असणारी भारतीय शेअरबाजाराची घसरण अखेर गुरुवारी थांबलेली दिसून आली. आशियाई बाजारातील तेजीचा लाभ भारतीय बाजाराला झाला. गुरुवारी सरतेशेवटी 628 अंकांनी तेजी दाखवत सेन्सेक्स आणि निफ्टी 153 अंकांनी वाढत बंद होताना पहायला मिळाला.
गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 628 अंकांनी वाढत 77537 अंकांवर बंद होताना दिसला. 50 समभागांचा समावेश असलेल्या निफ्टी निर्देशांकानेदेखील तेजी अनुभवली होती. हा निर्देशांक 153 अंकांनी वाढत 24231 च्या स्तरावर बंद होताना दिसला. बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये 2.6 लाख कोटी रुपयांचा लाभ दिसून आला.
बाजारातील समभागांचा विचार करता इटर्नल, श्रीराम फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक 2 ते अडीच टक्के इतके वाढलेले होते. त्याचप्रमाणे कोटक बँक, आयटीसी, बजाज फायनान्स व अॅक्सीस बँक यांचे समभाग सुद्धा मजबूत होत बंद झाले होते. या तेजीच्या बाजारात अदानी पोर्ट, ओएनजीसी, आयशर मोटर्स, इन्फोसिस, टायटन, मारुती सुझुकी, जिओ फायनान्स, एनटीपीसी, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, अदानी एन्टरप्रायझेस, रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी सुद्धा मजबुत कामगिरी करत बाजाराला तेजीतच ठेवण्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दुसरीकडे घसरणीत पाहता टाटा कंझ्युमरचा समभाग 1 टक्क्यांपेक्षा अधिक घसरणीत होता. यापाठोपाठ एसबीआय, अपोलो हॉस्पिटल, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स पीव्ही, टाटा स्टील, एसबीआय लाईफ, हिंडाल्को, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंडिगो यांचे समभाग कमकुवत बंद झाले. विविध क्षेत्रांची कामगिरी पाहता मीडिया आणि रियल्टी क्षेत्रातील समभागांची खरेदी गुंतवणूकदारांनी गुरुवारी केलेली पहायला मिळाली. बुधवारी सेन्सेक्स 326 अंकांनी आणि निफ्टी 77 अंकांनी घसरणीत राहिला होता. आशियाई बाजारात पाहता द. कोरियाचा कोस्पी 5.89 टक्के तर जपानचा निक्केई 1.36 टक्के वाढत बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग 0.80 टक्के वाढत बंद झाला.