वर्ग सात, शिक्षक मात्र एकच
कोल्हापूर :
संभाजीनगर रेसकोर्स नाका येथील छत्रपती संभाजी विद्यालय शाळा क्रमांक 30 मध्ये गेल्या आठ दिवसांपासून एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे संतप्त पालकांनी मंगळवारी शाळेत गोंधळ घातला. एकच शिक्षक एवढ्या मुलांना कसे शिकवणार? असा सवाल करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
यानंतर प्राथमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी तत्काळ शाळेत दाखल होत, तात्पुरत्या स्वरूपात तीन शिक्षकांची नेमणूक केली. गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेत वर्ग सात व शिक्षक मात्र एकच अशी स्थिती होती. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात पालकांनी नाराजी व्यक्त केली.
मनपा छत्रपती संभाजी विद्यालयात पहिली ते सातवी असे सात वर्ग भरतात. शाळेचा पट 65 ते 70 च्या आसपास आहे. शिक्षणाचा दर्जा व गुणवत्तेमुळे पालकांचा शाळेकडे ओढा आहे. शाळेतील मुलेही स्पर्धा परिक्षांमध्ये चमक दाखवितात. त्यामुळे शाळेची पटसंख्या वाढत आहे. गरीब व गरजूंना शाळेचा आधार असताना केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळेमध्ये नवीन शिक्षकांची गेल्या चार महिन्यापासून नियुक्तीच झालेली नाही.
शाळेत पूर्वी चार शिक्षक होते. चार महिन्यापुर्वी दोन शिक्षकांची बदली झाली. यानंतर दोनच शिक्षक राहिले. बदली झाल्यानंतर प्रशासनाकडून नवीन शिक्षकांची तत्काळ भरती करणे गरजेचे होते. पण दोन शिक्षकांवरच शाळेचे कामकाज सुरू राहिले. प्रशासनाकडून तात्पुरते दोन शिक्षक नियुक्त केले. ते रजेवर गेले. यानंतर 30 नोंव्हेबर रोजी आणखी एक शिक्षक निवृत्त झाल्यामुळे एकच शिक्षक शिल्लक राहिले. याबाबत प्रशासनाला कळवूनही दखलच न घेतल्याने सात वर्गासाठी एकच शिक्षक अशी स्थिती निर्माण झाली. मंगळवारी सकाळी पालकांनी थेट शाळेत येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
कायमस्वरुपी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू
मनपा प्राथमिक शिक्षण अधिकारी व्ही. एम. कांबळे यांनी शाळेत तात्पुरत्या स्वरूपात तीन शिक्षकांची नेमणूक करत जोपर्यंत संच मान्यतेनुसार कायमस्वरूपी नवीन भरती होत नाही तोपर्यंत हे तीन शिक्षक रूजू केले असल्याचे सांगितले. संच मान्यतेसाठी शिक्षण उपसंचालकांकडे कागदोपत्री व्यवहार झाला असून मान्यता मिळताच प्रशासकांच्या आदेशानुसार कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
गुणवत्ता चांगली पण प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
महापालिका शाळेतील मुले विविध स्पर्धा परिक्षांमध्ये जिल्ह्यासह राज्य पातळीवर चमकतात. शिक्षणाची दर्जा व गुणवत्ताही चांगली असल्याने मुलांसह पालकांचा ओढा आहे. काही शाळांमध्ये प्रवेशासाठी वेटिंग असते, असे असताना प्रशासनाने मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नियुक्त केलेले शिक्षक रजेवर
या शाळेतील बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी अन्य शाळेतील शिक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र, मर्जीची शाळा मिळत नसल्याने नियुक्त केलेले शिक्षक वांरवार रजेवर जात होते. आता, मात्र असे प्रकार घडले तर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.