दिल्लीत ‘आम आदमी’च्या सात आमदारांचे राजीनामे
मतदानाच्या पाच दिवस आधी घेतलेल्या पवित्र्याने अरविंद केजरीवालांना मोठा धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असताना आम आदमी पक्षात राजीनाम्याचा जोर वाढला आहे. त्रिलोकपुरीचे आमदार रोहितकुमार मेहरौलिया, कस्तुरबानगरचे आमदार मदन लाल, पालमच्या आमदार भावना गौर, मेहरौलीचे आमदार नरेश यादव आणि जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी यांनी आम आदमी पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच बिजवासन येथील बी. एस. जून आणि आदर्शनगर येथील पवन शर्मा यांनीही राजीनामा दिल्यामुळे पक्षाला रामराम ठोकणाऱ्या आमदारांची संख्या 7 वर पोहोचली आहे. नव्या उमेदवार निवडीवेळी आम आदमी पक्षाने या सर्वांची तिकीटे रद्द केल्यामुळे त्यांनी मतदानाला केवळ चार-पाच दिवसांचा अवधी असताना टोकाचा निर्णय घेत केजरीवालांना धक्का दिला आहे.
रोहित कुमार यांनी राजीनामापत्रात अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून, माझ्या समुदायाने तुम्हाला एकतर्फी पाठिंबा दिला. आमच्या समुदायाच्या पाठबळामुळे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार तीनदा स्थापन झाले. असे असूनही, कंत्राटी पद्धती बंद झाली नाही किंवा 20-20 वर्षे तात्पुरत्या नोकऱ्यांवर काम करणाऱ्या लोकांना कायम केले गेले नाही. माझ्या समुदायाचा वापर फक्त राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्होट बँक म्हणून केला जात आहे, असे ते म्हणाले होते.
मदन लाल यांनीही विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांना पत्र लिहित ‘मी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे’ असे कळवले आहे. ‘माझ्या कार्यकाळात मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो’ असे त्यांनी म्हटले आहे. तर भावना गौर यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात ‘मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा तुमच्यावर आणि पक्षावरचा विश्वास उडाला आहे.’ असे स्पष्ट केले आहे.
जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी यांनीही ‘आप’वर गंभीर आरोप केले. ‘अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी स्थापन केलेला आणि चळवळीतून जन्मलेला आम आदमी पक्ष आता एक भ्रष्ट पक्ष बनला आहे’ असा हल्लाबोल करत मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सर्व पदांचा मनापासून राजीनामा देत आहे, असे राजेश ऋषी यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर नरेश यादव यांनी आपल्या राजीनामापत्रात ‘मी प्रामाणिकपणाच्या राजकारणासाठी आम आदमी पक्षात सामील झालो होतो पण आज प्रामाणिकपणा कुठेही दिसत नाही’ असे नमूद केले आहे. आपण मेहरौलीमध्ये 100 टक्के प्रामाणिकपणे काम केले, असा दावाही त्यांनी केला आहे.