Kolhapur News: जिल्ह्यात सेवा पंधरवडा यशस्वी करा, आजपासून तीन टप्प्यात आयोजन
सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारे कार्यक्रम निरंतरपणे राबवले जाणार आहेत
कोल्हापूर : राज्यात महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत ‘सेवा पंधरवडा’ राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस बुधवारी 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा कालावधीत सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे. तसेच हा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारे कार्यक्रम निरंतरपणे राबवले जाणार आहेत. अभियान ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम, ‘सर्वांसाठी घरे’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी पूरक उपक्रम, जिल्हा प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत.
बुधवारी, 17 रोजी तालुक्यातील मंडळ निहाय दोन गावांची निवड करुन पाणंद रस्ते कार्यक्रम प्रसिध्दी, गाव शिवार फेरी व गावातील रस्त्यांची यादी तयार करणे, गुरूवारी, 18 आणि 19 रोजी ग्रामसभा घेऊन यादी अंतिम करणे, ग्राम ठरावासह तहसिलदारांना सादर करणे व अतिक्रमण रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करणे.
20 रोजी भूमी अभिलेख विभागाकडून गाव नकाशातील रस्त्याबाबत आवश्यक ठिकाणी सीमांकन करणे. तहसिलदारांनी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत सुनावणी घेऊन आदेश पारीत करणे. 21 रोजी अतिक्रमण निष्कासित करणे, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे 22 रोजी भूमी अभिलेख विभागाकडून दुय्यम पुनर्विलोकन नकाशात नोंदी घेणे.
29/08/2025 चे शासन निर्णयप्रमाणे रस्त्यांसाठी विशिष्ट क्रमांक निश्चीत करणे व ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रपत्र -3 गाव नमुना 1 (फ) (गावातील रस्त्यांची नोंदवही अद्यावत करणे). 23 रोजी प्रत्येक मंडळ अधिकारी स्तरावर फेरफार अदालत घेऊन प्रलंबीत फेरफार निर्गत करणे, भटक्या विमुक्त जातींसाठी 14 प्रकारचे विशेष लाभ देण्यासाठी शिबीर आयोजित करणे.
24 रोजी जिल्हास्तरीय प्लॅस्टीकमुक्ती याबाबत निबंध स्पर्धा, 25 रोजी प्लॅस्टीकमुक्तीबाबत पथनाट्या, 26 रोजी सर्वांसाठी घरे या उपक्रमातंर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारकांना जागेचे पट्टे वाटप 27 रोजी पन्हाळगड येथे चित्रकला स्पर्धा, 28 रोजी जिल्हास्तरीय नशामुक्ती रॅली, 29 रोजी प्रलंबीत माहिती अधिकार अर्ज निर्गती, माहिती अधिकार व सेवा हमी कायदा, माहितीपर कार्यक्रम, 30 रोजी आपले सरकार सेवा केंद्र व तलाठी कार्यालयाचे लोकेशन गुगल नकाशावर निश्चित करणे तर 1 ऑक्टोबर रोजी प्रत्येक मंडल अधिकारी स्तरावर चौकशी कामी प्राप्त प्रकरणांची निर्गती करणे, 2 ऑ क्टोबर रोजी फलनिष्पत्ती व समारोप होणार आहे.
अभियान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी व त्याचे समस्या निराकरण करण्याकामी कृती आराखडा तयार केला आहे. त्याची परिणामकारक अंमलबजावणी करुन संपुर्ण अभियान राबवण्यात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहील, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.