झारखंडमध्ये विरोधी आघाडीचा समझोता
वृत्तसंस्था / रांची
झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा समझोता झाला आहे. हे दोन्ही पक्ष मिळून राज्यातील विधानसभेच्या 81 जागांपैकी 70 जागांवर संघर्ष करणार आहेत. तसेच इतर 11 जागा विरोधी पक्षांच्या आघाडीतील इतर पक्षांना सोडल्या जाणार आहेत. या पक्षांमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष यांचा समावेश आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष यांच्याशी चर्चा केली जात आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली. जागावाटप समझोता करताना मित्र पक्षांना विश्वासात घेण्यात आले होते. समझोत्याच्या प्रसंगी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस या पक्षांचे वरीष्ठ नेते उपस्थित होते. कोणता पक्ष किती आणि कोणत्या जागांवर लढणार हे नंतर ठरविले जाणार आहे.
दोन टप्प्यांमध्ये मतदान
šाारखंड राज्याच्या विधानसभेसाठी 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने हा कार्यकम घोषित केला होता. आता राज्यात प्रचाराची धामधूम सुरु झाली असून विधानसभा निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रालोआचेही जागावाटप
भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप घोषित केले आहे. या जागावाटपानुसार भारतीय जनता पक्ष 68, ऑल झारखंड स्टुडंट्स् युनियन 10, संयुक्त जनता दल 2 आणि लोकजनशक्ती (रामविलास) पक्ष 1 असे सूत्र ठरले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून संयुक्त प्रचारसभाही घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती आहे.