मंत्री माविन गुदिन्हो यांना धक्का! चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यांनी सोडली साथ; स्वतः निवडणुकीत उतरण्याच्या जोरदार तयारीत
वास्को: दाबोळीत सध्या मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनीही भूमिका बदलली असून आपल्याच नेत्याविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. मंत्री गुदिन्हो यांच्या अनेक विरोधकांनीही कमलाप्रसाद यांना साथ देणे सुरु केल्याने दाबोळीत राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे. सध्या समाज माध्यमांवर हा राजकीय विषय गाजत आहे.
चिखलीचे विद्यमान सरपंच कमलाप्रसाद यादव मागच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासोबत होते. यंदा मात्र, ही जोडी फुटण्याच्या मार्गावर आहे. हल्लीच पार पडलेल्या काही कार्यक्रमांमध्ये मंत्री गुदिन्हो व सरपंच कमलाप्रसाद यादव एकत्र होते. परंतु त्यानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. सरपंच कमलाप्रसाद यांनी दाबोळीतून भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत.
भाजपाच्याच उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत, मात्र, उमेदवारी नाही मिळाली तरी ते मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी निवडणूक रिंगणात उत्तरतील. त्यादृष्टीने त्यांनी जोरदार तयारी चालवली आहे. पक्षातर्फे किंवा अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवणारच असा प्रचार त्यांनी चालवला आहे. भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोरही ते आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत. तसेच मंत्री गुदिन्हो यांच्यापासून दूर गेलेले बरेच जुने कार्यकर्ते कमलाप्रसाद यांच्या संपर्कात आहेत.
तुम्ही निवडणूक लढवाच, आम्ही तुमच्या पाठीशी राहू
बुधवारी संध्याकाळी दाबोळीतील जयरामनगरात कमलाप्रसाद यादव यांनी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात यादव यांचे व चिखलीच्या पंच असलेल्या त्यांच्या पत्नी सुनिता यादव यांचे अभिनंदन आणि बरेच गुणगान झाले, यादव यांनी निवडणुकीला उभे राहावेच, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, असे आश्वासन मंत्री गुदिन्हो यांच्यापासून दूर गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी दिले.
दाबोळीत माविन गुदिन्हो सलग तीनवेळा विजयी झाले आहेत. मागच्या वेळी विद्यमान खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माविनविरुद्ध विरोधकांकडे चेहराच नसल्याचे दिसत होते. त्यामुळे भाजपाने दाबोळीतला विजय गृहितच धरलेला आहे. परंतु, सरपंच यादव यांच्या भूमिकेने दाबोळीतल्या राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. मंत्री गुदिन्हो व मागची साडेचार वर्षे चिखलीचे सरपंच असलेले कमलाप्रसाद यादव आतापर्यंत एकमेकांचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता त्यांच्यात दरी निर्माण झाली आहे. त्यामुळेच गुदिन्हो यांना घरचा आहेर मिळालेला आहे. माविन गुदिन्हो यांना पाडण्यासाठी विरोधकांकडून कमलाप्रसाद यादव यांचा बऱ्यापैकी वापर होऊ शकतो.