गुजरातमधील आसाराम आ़श्रमाला झटका
अवैध कब्जायुक्त जमीन ताब्यात घेणार सरकार
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
अहमदाबादच्या मोटेरा भागातील आसाराम आश्रम ट्रस्टला गुजरात उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने जमीन वादाशी निगडित आश्रमाची याचिका फेटाळली आहे. या निर्णयानंतर आता राज्य सरकार 45 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक जमिनीवर पुन्हा नियंत्रण मिळविणार आहे. अहमदाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश न्यायालयाने कायम ठेवला आहे.
आश्रमाने वारंवार सरकारच्या अटींचे उल्लंघन केले आहे. अवैध कब्जाला वैध करण्याचा कुठलाच आधार नसतो असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ही जमीन दशकांपूर्वी केवळ धार्मिक उद्देशांसाठी आश्रमाला देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 33,980 चौरस मीटर जमीन उपलब्ध करण्यात आली होती. परंतु आश्रमाने हळूहळू सुमारे 50 हजार चौरस मीटर जमिनीवर कब्जा केला होता असा दावा करत सरकारने याकरता जीपीएस आणि उपग्रहीय मॅपिंगद्वारे पुरावे सादर केले. या पुराव्यांमधून आश्रमाने सरकारी जमिनीसोबत साबरमती नदीच्या काठावरील जमिनीवरही कब्जा केल्याचे स्पष्ट झाले.