अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात मोठा धक्का; भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 6 सदस्य अपात्र
पुणे : पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 6 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचा कर थकीत असल्याच्या कारणावरून अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
अपात्र ठरवण्यात आलेल्यांमध्ये सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी तसेच सदस्य विकास वाल्हेकर, प्रमोद ढगे, सारिका पदमुले आणि कविता चौरे यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतीशी संबंधित कर थकीत असल्याचे प्रकरण प्रशासनासमोर आल्यानंतर त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे भाजे ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय षडयंत्राचा आरोप
दरम्यान, अपात्र ठरवण्यात आलेल्या सदस्यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. आपल्याविरोधात करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असून, हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रशासकीय कारवाई आणि सदस्यांकडून करण्यात आलेले आरोप यामुळे भाजे ग्रामपंचायतीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर पुढील कायदेशीर अथवा प्रशासकीय पावले कोणती उचलली जातात, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.