आठवडाभरात हिरेबागेवाडीत कुत्र्यांसाठी शेल्टर उभारा
मनपा आरोग्य स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : कुत्र्यांसाठी पाच शेल्टर असणे आवश्यक
बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून नागरिकांवर हल्लेही वाढले आहेत. त्यामुळे तातडीने कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. शेल्टरसाठी निविदा मागविण्यात आली असून या कामाला आणखी काही दिवस विलंब लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पण तोपर्यंत हिरेबागेवाडी येथे आठवडाभरात तात्पुरर्ते कुत्र्यांसाठी शेल्टर्स उभारण्यात यावे, अशी सूचना आरोग्य स्थायी समिती बैठकीत करण्यात आली. शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी आरोग्य स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी राठोड होत्या. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविण्यासह त्याला मंजुरी देण्याची विनंती केली. तसेच बैठकीत विषय पत्रिकेवरील विषयही चर्चेला घेण्यात आले. भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. नागरिकांचा चावा घेतला जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आरोग्य विभागाने कोणती पाऊले उचलली आहेत अशी विचारणा सदस्य नितीन जाधव यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1 लाख लोकसंख्येच्यामागे 1 शेल्टर असणे गरजेचे आहे.
शहराची लोकसंख्या 5 लाख असल्याने कुत्र्यांसाठी पाच शेल्टर असणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या श्रीनगर येथील एबीसी सेंटर बंद असल्याने कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे तातडीने केके कोप्प येथे कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. या कामासाठी निविदा मागविली असून शेल्टर उभारण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केल्याने डॉ. नांद्रे म्हणाले, आम्हाला शेल्टर उभारण्यासाठी जागा द्या, मी जनावरांचा डॉक्टर नाही, केवळ त्या विभागाचा अतिरिक्त पदभार आहे, असे ते म्हणाले. शेल्टर तातडीने बांधून देण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात यावे. यापूर्वीच आम्ही मनपा आयुक्तांना पत्र दिले असल्याचेही डॉ. नांद्रे यांनी बैठकीत स्पष्ट केले. तातडीने हिरेबागेवाडी येथे कुत्र्यांसाठी तात्पुरर्ते शेल्टर उभारण्याचे काम सुरू करावे. तसेच सदर काम आठवडाभरात पूर्ण झाले पाहिजे, असा ठराव बैठकीत केला.
अन्यथा संबंधितांवर एफआयआर दाखल करा
कांदा मार्केट आणि बापट गल्ली येथील कार पार्किंग येथे महापालिकेच्या मालकीचे टॉयलेट आहेत. त्यांचा ठेका विजापूर येथील एका ठेकेदाराने घेतला आहे. मात्र तेथील काहीजण ठेकेदाराकडे टॉयलेटचा ताबा देत नाहीत, अशी तक्रार बैठकीत करण्यात आली. अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून तातडीने संबंधित ठेकेदाराकडे टॉयलेटांचा ताबा द्यावा तसेच संबंधितांवर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.