नेतृत्त्व बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर तोडग्यासाठी मुहूर्त निश्चित?
15 मे पूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीभेटीचे निमंत्रण शक्य
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
गेल्या काही महिन्यांपासून राज्य राजकारणात मोठा चर्चेचा विषय बनलेल्या मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसश्रेष्ठींनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील नेतृत्त्वावरून सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठांनी मुहूर्त निश्चित केल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मे पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून राज्यातील नेतृत्वबदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत दीर्घ चर्चा करून गोंधळावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. 10 मे पूर्वी केरळमध्ये मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस हायकमांड कर्नाटकातील पक्षाच्या राजकारणाकडे लक्ष देतील. दिल्लीत होणाऱ्या राज्य काँग्रेसमधील पुढील दिशा निश्चित होणार आहे.
केवळ मुख्यमंत्री बदलावरच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळातून कोणाला वगळावे, कोणाला समाविष्ट करावे, याविषयी देखील काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार व प्रभावी नेत्यांनी दिल्लीस्तरावर आतापासून लॉबिंग सुरू केली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यंतरी सत्ताधारी काँग्रेसमध्ये महत्त्वाचे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.
हायकमांडकडून निमंत्रण मिळताच दिल्ली दौरा : सिद्धरामय्या
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासंदर्भात पक्षाच्या हायकमांडकडून अद्याप कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. हायकमांडने निमंत्रण दिल्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊ, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा सुरू आहे. अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. वरिष्ठांवर दबाव आणण्यासाठी काही आमदारांनी दिल्ली दौराही केला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी हायकमांडकडून हिरवा कंदील मिळण्याची वाट पाहत असल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.
आधी गोंधळ दूर केला पाहिजे!
हायकमांडने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून गोंधळाला ‘ब्रेक’ लावावा. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यापूर्वीही असेच सांगितले होते. सर्वांचे मत एकच आहे. जो काही निर्णय असेल, तो घेतला पाहिजे. आधी गोंधळ दूर केला पाहिजे.
- सतीश जारकीहोळी, सार्वजनिक बांधकाम मंत्री