अधिवेशन कामकाज समितीची उद्या बैठक
पणजी : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाज निश्चित करण्यासाठी सल्लागार समितीची बैठक येत्या 25 जानेवारी रोजी म्हणजे उद्या गुऊवारी होणार आहे. त्यात एकूण 6 दिवसांचे कामकाज ठरणार आहे. विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी सदर माहिती दिली आहे. शुक्रवार दि. 2 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यात कामकाजाचे एकूण 6 दिवस असून त्यात कोणते काम करायचे हे सल्लागार समिती ठरवणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने 2024-25 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार असून त्याची तयारी नेटाने सुरू आहे. तो अर्थसंकल्प लोकाभिमुख असणार अशी आश्वासने डॉ. सावंत देत असून त्याच अनुषंगाने संबंधितांशी चर्चा करीत आहेत. नवीन वर्ष 2024 मधील हे पहिलेच विधानसभा अधिवेशन असल्यामुळे ते राज्यपालांच्या अर्थभाषणाने सुरू होणार आहे. त्यात खासगी ठराव, सरकारी विधेयके, प्रश्नोत्तर तास, शून्य तास, लक्षवेधी सूचना असे विविध कामकाज समाविष्ट आहे.