जम्मू-काश्मीर विधानसभेचे आजपासून अधिवेशन
दहशतवादी हल्ल्यांवरून गदारोळाची शक्मयता : अधिवेशनापूर्वी सभापतींची निवड होणार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर विधानसभेचे पहिले अधिवेशन सोमवार, 4 नोव्हेंबरपासून सुरू हेत आहे. अधिवेशनापूर्वी रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मित्रपक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेस, सीपीआय(एम), आम आदमी पार्टी आणि अपक्ष आमदारांचा आमंत्रित करण्यात आले होते. 10 वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ आमदार अब्दुल रहीम रादर यांना नव्या सरकारमध्ये सभापती (स्पीकर) बनवले जाऊ शकते. रादर हे सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि केंद्रशासित प्रदेशातील पहिल्या विधानसभेतील ते सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. यानंतर उपराज्यपालांचे भाषण होईल. या बैठकीत अब्दुल्ला सरकारची आगामी रणनीती आणि योजनांवरही चर्चा होऊ शकते. या बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या सर्व आमदारांनाही बोलावण्यात आले आहे. अब्दुल्ला सरकार भाजपला उपसभापतीपद देऊ शकते. मात्र, अद्याप यासंबंधीची कोणतीही माहिती सरकारकडून भाजपला देण्यात आलेली नाही.
वाढत्या हल्ल्यांचे पडसाद उमटणार
ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात 6 दहशतवादी हल्ले झाले आहेत. यात लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह सहा दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच चकमकीत 3 जवानही हुतात्मा झाले. याशिवाय 8 बिगर काश्मिरी मजुरांचाही मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरींना लक्ष्य करून अनेक हल्ले केले आहेत. ओमर अब्दुल्ला यांचे वडील फाऊख अब्दुल्ला यांनी दहशतवाद्यांबाबत दिलेल्या वक्तव्याबाबतही अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्मयता आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार करू नये, तर त्यांना अटक करावी, असे म्हटले होते. यावरून भाजपने फाऊख अब्दुल्ला यांना लक्ष्य केले होते.
सुनील शर्मा विरोधी पक्षनेते
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाने सुनील शर्मा यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे, तर नरेंद्र सिंह यांची जम्मू-काश्मीर विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेशातील 2022 च्या सीमांकन प्रक्रियेनंतर पद्दार नागसेनी या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघातून 47 वषीय भाजप नेते सुनील शर्मा दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीर विधानसभेवर निवडून आले आहेत. सुनील शर्मा 2014 ते 2018 पर्यंत पीडीपी-भाजप युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते.