तिळा उघड
मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. छोटासा चिमुकला तीळ, परंतु मराठी भाषेत त्याला मानाचे आणि मोलाचे स्थान आहे. अलीबाबाची गुहा ‘तिळा उघड’ म्हटले की उघडते व अद्भुत, विस्मयकारक खजिना सापडतो, असे आभासी स्वप्न बघत एक पिढी मोठी झाली आणि काळाने छोट्या भ्रमणध्वनीच्या रूपात ते स्वप्न मूर्त केले. जगाची सफर क्षणात घडवून हवे ते ज्ञान समोर आणण्याची किमया माणसाच्या हातात आली ती त्याच्या अफाट बुद्धिमत्तेमुळेच. स्थूलातून सूक्ष्मात नेणारा जणू हा तीळच. भाषेत तिळाचे प्रकार आहेत. खायचा तीळ, शरीरावरचा तीळ आणि अध्यात्मातील गूढ अर्थांची उकल करणारा तीळ.
शरीरावरचा तीळ सौंदर्य खुलवतो, त्याचबरोबर तो ऐश्वर्यदायी असतो असे म्हणतात. सुप्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम म्हणतात की, ‘आयुष्यातून गेलेली वर्षे व आलेले अनुभव हे शरीरावरील कपड्यांसारखे नसतात, तर शरीरावरील तिळासारखे असतात. जे दिसत तर नाहीत पण शरीराला चिकटून आपली जागा न सोडणारे असतात.’ म्हणून अनुभव आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असतात. आईचे अंत:करण आपल्या मुलांसाठी तीळतीळ तुटते असा वाक्प्रचार आहे. आईच्या हृदयातले वात्सल्य तिळाएवढे सूक्ष्म आणि तेवढेच व्यापक असते म्हणून असे म्हणत असावेत. क्रोधाने शरीरावर घाला केला की अंगाचा तीळपापड होतो. शरीराबरोबरच मनाशीही तीळ जोडून आहे. तीळमात्र शंका नसणारे मन परमेश्वराला आवडते. तीळभरही आसक्ती संतांच्या मनात नव्हती हे त्यांच्या चरित्रांवरून लक्षात येते. संत तुकाराम महाराज एका अभंगात विठ्ठलाला ‘परी माझा तीळ । न सोडी मी आता’, असे म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, ‘हत्ती एक मण ।मुंगी तीळ जाण । तृप्ती ज्यासमान देत आहे’. हत्ती आणि मुंगी यांची काही बरोबरी नसली तरी ज्याची त्याची तृप्ती-अतृप्ती त्याच्यापुरतीच असते. महाराज म्हणतात, तू कुणाला वैकुंठ, तर कुणाला कैलासाचा रहिवास देतोस. मला त्याचा काही हेवा नाही. माझी तुझ्याकडून तिळाएवढी अपेक्षा आहे. तुझी धर्मपत्नी साक्षात लक्ष्मी आहे. ‘तुका म्हणे माझे देणे आहे किती/दाता लक्ष्मीचा पती’.. ‘हे विठ्ठला, माझा तीळ तेवढा देऊन टाक. त्यावर माझे समाधान आहे’, असे तुकाराम महाराज का म्हणतात? कारण देव तिळात येतो.
‘देव तिळी आला। गोडे गोड जीव धाला
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ
पाप-पुण्य गेले । एका स्नानेची खुंटले
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दनी जनी?’
-मकर संक्रमणाच्या काळी देव तिळात आला आहे. हे संक्रमण जिवाचा शिवाकडे प्रवास असे अनोखे आहे. हा पर्वकाळ साधला आणि जिवाच्या आसपास राहणारे, त्याला धरून ठेवणारे षडरिपू पळून गेले. अंत:करण शुद्ध झाले. जिवाचे रूपांतर शिवात झाले की पाप-पुण्य काही राहत नाही. अंतर्स्नानामुळे तिळगूळ घेणारा आणि तिळगूळ देणारा हे दोघेही परमेश्वराचीच रूपे आहेत आणि हा परमेश्वरी लीलेचाच एक आविष्कार आहे याचा साक्षात्कार होतो. या स्नानाने अंतरीचा मळ क्षणात निघून जातो. मन शुद्ध, निर्मळ होते. ही जणू ज्ञानगंगा. या गंगास्नानाने संचित पाप-पुण्य गेले आणि क्रियामाण पाप-पुण्य लागेनासे झाले. ‘तुका म्हणे वाणी, शुद्ध जनार्दन जनी..’ संत तुकाराम महाराज म्हणतात, आता वाणी फक्त भगवत्स्वरूप जाणते. आता जनांमध्ये सर्वत्र फक्त जनार्दन दिसतो. हा देवरूपी तिळगूळ तुकोबाराय देतात. तिळगूळ देताना त्यामध्ये परमेश्वर दिसावा ही त्यांची इच्छा आहे.
‘तिळगूळ घ्या गोड बोला’ ही भारतीय संस्कृतीची शिकवण मोलाची आहे. यात वाणीची तपश्चर्या आहे. जुने मतभेद विसरा, भांडणांना विराम द्या. मुख्य म्हणजे अहंकाराचे विसर्जन करा हा संदेश यात आहे. पूर्वी जेव्हा भ्रमणध्वनी, दूरध्वनी नव्हते तेव्हा संवाद हा फक्त संपर्कातून होता. मानवी स्वभावानुसार आप्तस्वजनांमध्ये एखाद्या समारंभात उणीदुणी निघत आणि शब्दाने शब्द पेटत असे. त्याचे पर्यवसान अबोला धरण्यात व्हायचे. ही धुसफूस, मनातला राग मकर संक्रांतीच्या पर्वकाली संपत असे. वडीलधारी मंडळींनी मनाचा मोठेपणा दाखवत लहानांकडे तिळगूळ घेऊन जाण्याची पद्धत होती. तिळगूळ खरोखरच भांडणे मिटवत असे. परस्परांमध्ये स्नेहबंधाचा पूल बांधणारा, आयुष्यातली गोडी वाढवणारा हा सण आहे.
तिलांजली हा शब्द श्राद्धविधीशी निगडित आहे परंतु तो एखादी गोष्ट कायमची संपवली हे सूचकपणे सांगण्यासाठी सर्रास वापरला जातो. श्राद्धामध्ये पितरांना तीळयुक्त पाणी देतात. त्याला तिलांजली म्हणतात. स्थूल देहाचा त्याग केल्यानंतर जीवपण सोडून त्यांनी परमात्म्याचे सान्निध्य मिळवून सुखी व्हावे हा त्यामागचा संदेश आहे. यज्ञात आहुतीसाठी तीळ वापरतात. देवतांना तीळ प्रिय आहे. तीळ हा प्राण पुष्ट करतो. तिळाच्या माध्यमातून देवतांना प्राण पोचतो. तिळामुळे पदार्थांना रुची येते.
अध्यात्म क्षेत्रात तीळ गूढ अर्थाने चमकतो. संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे-‘तिळाएवढे बांधून घर आत राहे विश्वंभर’.. स्वामी मुक्तानंद म्हणतात, कुंडलिनी शक्ती जेव्हा सहस्रधारी पोहोचते तेव्हा दिव्य प्रकाशाचा अनुभव येतो. कोटी सूर्याच्या दिप्तीसारखी त्याची दिप्ती असते. त्यात चिमुकला, अतिसुंदर व आकर्षक निळबिंदू असतो. गाढ ध्यानामध्ये त्याचे दर्शन होते. हा निळबिंदू सर्व मानव देहात विराजमान आहे. तो सूक्ष्माहून सूक्ष्म आणि मोठ्याहून मोठा आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘तिळाएवढे बिंदूले, त्यात त्रिभुवन कोंदाटले’. हा विश्वंभर त्यात राहतो आणि ब्रह्मा-विष्णू-महेश त्यात येत-जात असतात. ‘तुका म्हणे हे विठ्ठले, तेणे त्रिभुवन कोंदाटले’. हे प्रत्यक्ष आत्म्याचे रूप आहे. सारे ब्रह्मांड सामावलेले हे विश्वेश्वराचे घर तिळाएवढे आहे. चिमुकला तीळ माणसाच्या विश्वाला व्यापून उरला आहे.
-स्नेहा शिनखेडे