सेवा क्षेत्राचा निर्देशांक जानेवारीत उच्चांकावर
6 महिन्यानंतर 61.8 दराच्या स्तरावर पोहचला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा सेवा क्षेत्राचा निर्देशांक (पीएमआय)सहा महिन्यानंतर उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या जानेवारी महिन्यामध्ये भारतीय सेवा क्षेत्राचा निर्देशांक 61.8 इतका राहिला होता. एचएसबीसी इंडिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे गेल्या सहा महिन्यांमध्ये पाहता जानेवारीतला दर हा उच्चांकी मानला जात आहे. जानेवारी महिन्यात भारतातील सेवा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सेवा क्षेत्राचा निर्देशांक दर जानेवारीमध्ये 61.8 इतका झाला आहे. याआधी डिसेंबर महिन्यामध्ये हाच दर 59 इतका होता.
सेवा क्षेत्र विस्तारले, रोजगारही वाढले
जुलै 2023 नंतर पाहता निर्देशांक दराने लक्षणीय कामगिरी नोंदवली आहे. याआधी पाहता जुलै 2023 मध्ये सेवा निर्देशांक दर 62.3 इतका होता. 50 पेक्षा अधिक दर असणे म्हणजे सेवा क्षेत्राचा विस्तार होत असल्याचे लक्षण मानले जाते. गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये सेवा क्षेत्राचा विस्तार आणि विकास झपाट्याने होताना दिसतो आहे. नवे व्यवसाय उभारले जात असून या अनुषंगाने नोकऱ्यांची उपलब्धताही बऱ्यापैकी झालेली पाहायला मिळते आहे.
निर्यात ऑर्डरमध्ये झाली वाढ
नव्या निर्यात ऑर्डरमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पाहता जानेवारीमधील ऑर्डर ही विक्रमी स्तरावर राहिली असल्याची माहिती आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, युरोप, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात यासारख्या देशांमधून निर्यातीला वाव मिळतो आहे.