For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टिळकवाडी परिसरातील सर्व्हिस रोड बनले मद्यपींचे अड्डे

06:50 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
टिळकवाडी परिसरातील सर्व्हिस रोड बनले मद्यपींचे अड्डे
Advertisement

सर्व्हीस रोडची स्वच्छता व देखभालीकडे मनपाचे दुर्लक्ष, स्थानिक रहिवाशांतून तीव्र नाराजी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

टिळकवाडी परिसरातील सर्व्हीस रोडची स्वच्छता आणि देखभालीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने सर्व्हीस रोड मद्यपींचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्यावेळी सदर ठिकाणी थांबून मद्य प्राशन करण्यासह धूम्रपान करीत धिंगाणा घातला जात असल्याने स्थानिक रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement

शहर व उपनगरातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. रस्त्यांची चाळण झाली असली तरी देखील दुरुस्तीकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना खड्डयातूनच ये-जा करण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असला तरीदेखील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाहीत. त्यातच उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळकवाडी परिसरातील सर्व्हीस रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे. सर्व्हीस रोडची दुरुस्ती करण्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने त्या ठिकाणी अनेक बेकायदा घडामोडी घडत आहेत. बहुतांश ठिकाणी सर्व्हीस रोडवरच फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटले आहेत.

रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला आहे. विशेष करून टिळकवाडीतील गुरुवारपेठ, बुधवारपेठ आदी ठिकाणच्या सर्व्हीस रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था बनली आहे. रस्यावर केरकचरा पडून आहे. तसेच झाडेझुडुपे वाढली आहेत. सर्व्हीस रस्त्यांची स्वच्छता करून तेथील केरकचरा यापूर्वी उचलला जात होता. तसेच सर्व्हीस रस्त्याच्या कोपऱ्यावर कचराकुंडी देखील ठेवण्यात येत होती. पण गेल्या काही वर्षांपासून सर्व्हीस रस्त्याची देखभाल व कचरा वाहून नेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. टिळकवाडी परिसरातील घरे व बंगले सात ते आठ गुंठ्यात बांधण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांच्या परसात झाडे आणि गार्डन तयार करण्यात आल्या आहेत. झाडांचा पालापाचोळा टाकावा कुठे, असा प्रश्न तेथील रहिवाशांसमोर उभा ठाकला आहे. स्थानिक रहिवाशांची समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

खुल्या ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र टिळकवाडी परिसरात सर्व्हीस रस्त्यांवर थांबून मद्य ढोसणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हाकेवर गुरुवारपेठ येथील सर्व्हीस रोड आहे. मात्र त्या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला आहे. सर्व्हीस रोडवर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

Advertisement
Tags :

.