बुधवारीही सर्व्हरडाऊन समस्या
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी वाढली गर्दी : समस्या दूर करण्याची मागणी
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरडाऊन समस्येमुळे महानगरपालिकेतील कामकाजावर परिणाम होत आहे. जन्म आणि मृत्यू दाखला घेण्यासाठी गेले असता सर्व्हरडाऊन समस्येमुळे रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. जन्म आणि मृत्यू दाखल्याची नोंद करणे, तसेच दाखला घेण्यासाठी दररोज महानगरपालिकेतील कार्यालयासमोर गर्दी होत आहे. त्याठिकाणी केवळ एकच काऊंटर असल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. यातच सर्व्हरडाऊन समस्येमुळे तेथील कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. सकाळी सुरू झाल्यानंतर अचानकपणे सर्व्हरडाऊन होत आहे. काहीवेळ थांबावे लागत आहे. त्यानंतर पुन्हा काहीवेळच सर्व्हर सुरू होते. त्यानंतर अचानक पुन्हा बंद पडत आहे. या समस्येमुळे येथील कर्मचारीही वैतागले आहेत.
विविध कामांसाठी जन्म आणि मृत्यू दाखल्याची नितांत गरज निर्माण होत आहे. त्यामुळे सारेजण दोन्ही दाखले घेण्यासाठी धडपडत आहेत. यातच नवीन नियमांमुळे आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. नावामध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागत आहे. एक वर्ष उलटल्यानंतर जन्म किंवा मृत्यू दाखला हवा असेल तर थेट न्यायालयात जावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेवर अधिक ताण पडत आहे. बऱ्याचवेळा ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म किंवा मृत्यू होतो, त्याठिकाणी संबंधित व्यक्तीची नोंद करताना चुका होत आहेत. त्याचा फटकाही जनतेला बसत आहे. तेव्हा सर्व्हर समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.