For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेशनकार्डच्या कामात सर्व्हरडाऊनची समस्या

06:07 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेशनकार्डच्या कामात सर्व्हरडाऊनची समस्या
Advertisement

लाभार्थी निराश : शासकीय सुविधांपासून लाभार्थी वंचित

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शासनाकडून शनिवारी रेशनकार्डच्या कामाला काहीकाळ प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, यामध्ये सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना माघारी परतावे लागले. रेशनकार्डचे काम अनियमित झाल्याने काही लाभार्थ्यांना गॅरंटी योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. मागील दोन वर्षांपासून रेशनकार्डचे काम सुरळीत सुरू नसल्याने अनेकांना शासकीय कामांबरोबर इतर सोयी-सुविधांपासूनही दूर रहावे लागत आहे. त्यामुळे रेशनकार्डचे काम सुरळीत सुरू करा, अशी मागणीही दारिद्र्यारेषेखालील लाभार्थ्यांतून होऊ लागली आहे.

Advertisement

शुक्रवारी आणि शनिवारी काहीकाळ रेशनकार्डच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. शुक्रवारी केवळ दोन तास नवीन बीपीएल रेशनकार्डचे अर्ज स्वीकृती सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, एवढ्या कमी कालावधीत अर्ज स्वीकृतीचे काम पूर्ण झाले नाही. शनिवारी रेशनकार्डचे काम सुरू होईल, या आशेने लाभार्थी ऑनलाईन सेंटरवर आले होते. मात्र, शनिवारी सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण झाल्याने पुन्हा निराशेने जावे लागले आहे.

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामध्ये गृहलक्ष्मीसाठी रेशनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, शासनाकडूनच रेशनकार्डचे काम ठप्प करण्यात आल्याने अनेकांना या योजनेपासून दूर रहावे लागत आहे. त्यामुळे रेशनकार्ड द्यायचे नसेल तर योजना कशाला अंमलात आणता? असा प्रश्नही सर्वसामान्य लाभार्थ्यांतून उपस्थित होऊ लागला आहे. दोन वर्षांपासून काहींनी रेशनकार्डसाठी अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या पदरात रेशनकार्ड पडलेले नाही.

लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होणार आहे. याकाळात शासकीय कागदपत्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे रेशनकार्डच्या कामालाही स्थगिती मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनियप्पा यांनी 1 एप्रिलपासून नवीन रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याने रेशनकार्डचे काम कसे चालणार? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे रेशनकार्डसाठी नागरिकांना निवडणूक संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

Advertisement
Tags :

.