सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडी विभागातील सर्व्हरडाऊन
रुग्ण-नातेवाईकांना दिवसभर हॉस्पिटलमध्येच घिरट्या घालण्याची वेळ : बिम्स प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमधील बाह्या रुग्ण विभागातील (ओपीडी) सर्व्हर समस्येमुळे रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या कायम असली तरी ती सोडविण्याकडे बिम्सने दुर्लक्ष केले असल्याने रुग्ण व नातेवाईकांची हेळसांड होत आहे. मंगळवार दि. 9 रोजी सकाळी 10.30 वाजता रांगेत उभ्या राहिलेल्या रुग्णांना दुपारी 1 पर्यंत ओपीडी कागद मिळविण्यासाठी थांबावे लागले. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी बिम्सने पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.
जिल्ह्यातील गरीब जनतेचे रुग्णालय म्हणून सिव्हिल हॉस्पिटलकडे पाहिले जाते. या ठिकाणी विविध प्रकारचे औषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अॅडमिट होणाऱ्या रुग्णांसह ओपीडी रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सिव्हिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोय करण्यात आली आहे. मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून बाह्या रुग्णांची नोंद करून घेतली जात असल्याने वारंवार सर्व्हर समस्या उद्भवत आहे. दोन ठिकाणी ओपीडी काऊंटर असले तरीही वेळेत ओपीडी कागद मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे लांबून येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांना दिवसभर सिव्हिल हॉस्पिटलमध्येच घिरट्या मारण्याची वेळ आली आहे.
ऑफलाईन ओपीडी कागद देण्याची सूचना
मंगळवारी सर्व्हर समस्येमुळे ओपीडी कागद मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. त्यानंतर बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इराण्णा पल्लेद यांनी तातडीने ओपीडी काऊंटरला संपर्क साधून रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईनऐवजी ऑफलाईन ओपीडी कागद देण्याची सूचना केली.