महापालिकेत सर्व्हरचा गोंधळ, दाखल्यांसाठी नागरिकांचे हाल
कोल्हापूर :
जन्म-मृत्यू दाखला देण्याची प्रक्रिया देशपातळीवर ऑनलाईन केली आहे. सर्व्हर डाऊन झाल्यानंतर ही सेवा बंद पडत आहे. शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेतील सर्व्हर बंद पडल्याने सुमारे पाच तास सेवा बंद पडली. यामुळे दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले.
केंद्र आणि राज्यशासनाने देशभरात एनआयसी मार्फत जन्म-मृत्यू दाखले देण्याची सुविधा ऑनलाईन केली आहे. देशभरात कुठेही दाखला पाहता यावा. नोकरीमध्ये चुकीचे वय घालून फसवणूक होऊ नये अशा अनेक कारणासाठी हा निर्णय घेण्यात आला. याचा उद्देश जरी चागंला असला तरी वारंवार ऑनलाईन सिस्टममध्ये बिघाड होत आहे. सर्व्हर डाऊन होत असल्याने जन्म-मृत्यू दाखले अपडेट करण्याचे काम थांबते.
कोल्हापूर महापालिकेमध्ये काही दिवसांपासून सर्व्हर डाऊनचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी पाच सर्व्हर डाऊन झाल्याने नागरी सुविधामध्ये दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. तसेच नावात बदलसाठी आलेल्या नागरिकांचेही हाल झाले. पूर्वीची जुनीच पद्धत बरी म्हणण्याची वेळ येथील प्रशासनावर आली आहे.