यंत्रमानवाकडून धर्मोपदेश
मानव करु शकेल अशी अनेक कामे यंत्रमानव किंवो रोबोही करु शकतात, ही आता वस्तुस्थिती बनली आहे. तथापि, यंत्रमानव ‘धर्मगुरु’ही होऊ शकतो, हे जपानने दाखवून दिले आहे. जपानच्या क्योटो विद्यापीठातील संशोधकानी आणि तंत्रज्ञांनी एक यंत्रधर्मगुरु निर्माण केला असून तो बौद्ध धर्माचा उपदेश करतो. बौद्ध धर्म लोकांना समजावून सांगतो. अशा प्रकारे आता धर्मातही अत्याधुनिक विज्ञानाचे प्रत्यक्ष प्रवेश केला असल्याचे दिसून येत आहे. या यंत्रधर्मगुरुचे ‘बुद्धारॉईड’ असे नामकरण करण्यात आले आहे. तो एक ‘ह्यूमॅनॉईड’, अर्थात, मानवासारखा दिसणारा यंत्रमानव आहे. तो मानवाप्रमाणेच दोन पायांवर चालतो आणि माणसासारखाच बोलतो. तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तरही त्याला देता येत आहे.
या यंत्रमानवाची निर्मिती ‘कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञाना’च्या साहाय्याने करण्यात आलेली आहे. त्याला याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बौद्ध धर्माची शिकवण देण्यात आली आहे. तो बौद्ध धर्मग्रथांचा ‘महापंडित’ आहे. त्याला हे धर्मग्रंथ मुखोद्गत आहेत. इतकेच नव्हे, तर तो या धर्मग्रंथातील वचनांचा योग्य तो अर्थ लावू शकतो. बौद्ध धर्मावर विद्वत्ताप्रचुर प्रवचन करु शकतो. या धर्माचा उपदेश करु शकतो. त्याची थोरवी वर्णन करु शकतो. मानवी धर्मगुरुपेक्षाही त्याचे धर्माचे ज्ञान प्रचंड आणि अचूक आहे, असे दिसून येत आहे. त्यामुळे तो बौद्ध धर्मासंबंधीच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. या धर्माच्या संबंधी अत्यंत जटील, गूढ आणि किचकट प्रश्नांची उकल तो लीलया करु शकतो, अशी त्याची ख्याती आहे. त्याच्या प्रथम धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच करण्यात आला. ही जणू त्यांची परीक्षाच होती. तो या परीक्षेत उत्कृष्टरित्या उत्तीर्ण झाला.
प्रवचनानंतर त्याने पत्रकार परिषदही घेतली. पत्रकारांनी त्याला बौद्ध धर्माविषयी आणि मानवी मनाच्या कियाकलापांविषयी काही प्रश्न विचारले. त्यांची त्याने व्यवस्थित उत्तरे दिली. मनात येणाऱ्या विचारांपाठीमागे आंधळेपणाने धावू नका आणि सांगोपांग विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, हा गौतम बुद्धाचा उपदेश आहे, असे उत्तर त्याने एका प्रश्नाला दिले. या उत्तरातून त्याच्या बौद्ध धर्माच्या सखोल ज्ञानाविषयी उपस्थितांचे शंकासमाधान झाले. यापुढच्या काळात असे अनेक यंत्रधर्मगुरु निर्माण केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.