रघुवंशी हत्या प्रकरणाला गंभीर वळण
पत्नी सोनमविरोधात आणखी पुरावे, गूढ उकलणार
वृत्तसंस्था / शिलाँग
मेघालयात काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता नवे पुरावे समोर आल्याने पत्नी सोनमविरोधात कायद्याचा फास आवळत चालला आहे, असे दिसून येत आहे. राजा रघुवंशी याची हत्या पत्नी सोनमच्याच सांगण्यावरुन करण्यात आली, असे आत्तापर्यंतच्या तपासात उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, सोनम हिने आरोप नाकारला आहे. आपल्याला गुंडांच्या हातून वाचविताना आपली पती दरीत कोसळला, असे तिचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुशवाहा याच्यासह सोनम हत्या झालेल्या स्थळी होती, असे सीसीटीव्ही फूटेजवरुन दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हत्या झाल्यानंतर पत्नी सोनम मेघालयहून इंदूरला रेल्वेने परत आली. इंदूरला आल्यानंतर पुन्हा तिची राज कुशवाहा यांच्यासह भेट झाली. राज कुशवाहा हा तिचा प्रियकर असून त्याच्या साहाय्याने तिने आपला पती राजा रघुवंशी याच्यावर मारेकरी घालून त्याची हत्या केली आणि मृतदेह दरीत फेकल्याचा आरोप आहे
मोबाईल महत्वाचा पुरावा
सोनम आणि राजा रघुवंशी यांचा विवाह इंदूर येथे झाल्यानंतर सोनमच्या आग्रहामुळे तिचा पती मेघालयला मधुचंद्रासाठी जाण्यास राजी झाला. जाताना पत्नीच्या आग्रहामुळे त्याने 10 लाख रुपयांचे दागदागिनेही सोबत घेतले होते. मेघालय येथे गेल्यानंतर त्यांनी त्यांची कोणतीही छायचित्रे आपल्या कुटुंबियांना पाठविली नाहीत. तथापि, त्याची हत्या झाल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्या मोबाईलवरुन त्याच्यासोबतची काही छायाचित्रे कुटुंबियांना पाठविली, असे दिसून आले आहे. त्यामुळे ही छायाचित्रे आणि मोबाईल हा महत्वाचा पुरावा ठरणार आहे. मेघालयमधील दरीत रघुवंशी याचा मृतदेह 2 जून या दिवशी आढळला होता. तो 23 मे पासून बेपत्ता असल्याची तक्रार सादर करण्यात आली होती.
दुर्गम भागाची निवड
मेघालयला मधुचंद्रासाठी गेल्यानंतर सोनम हिने पतीसह फिरण्यासाठी अधिक लोकप्रिय असणारा आणि अधिक गर्दीचा तिर्ना भाग निवडण्याऐवजी अधिक दुर्गम आणि तुरळक पर्यटकांचा माललिंगखियात हा भाग निवडला. या भागात रघुवंशी याचे मारेकरी आधीच आलेले होते. सोनम हिने पतीला त्याच्या न कळत या मारेकऱ्यांपर्यंत नेले, असा आरोप आहे. तेथे पर्यटकांची गर्दी नसल्याने त्याची हत्या करणे सोपे गेले. याचा अर्थ ही सर्व योजना आधीच सज्ज करण्यात आली होती. अतिशय थंड डोक्याने पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर यांनी मारेकऱ्यांच्या माध्यमातून रघुवंशी याचा खून केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हत्येनंतर सोनमही बेपत्ता
2 जूनला रघुवंशी याचा मृतदेह सापडल्यानंतर एक आठवडा सोनमही बेपत्ता होती. ती नंतर उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. 8 जूनला तिला अटक करण्यात आली होती. आपल्याला अंमली पदार्थ देऊन गाझीपूरला आणण्यात आले असे तिचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांच्या दृष्टीने ती या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे.
आतापर्यंत 4 अटकेत
या प्रकरणात आतापर्यंत सोनम रघुवंशी हिला अटक करण्यात आली असून मारेकऱ्यांपैकी आकाश रजपूत, विशालसिंग चौहान आणि आनंद कुमरी यांना अटक करण्यात आली आहे. सोनमचा कथित प्रियकर असणारा राज कुशवाहा यालाही यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो पोलिसांच्या कोठडीत आहे. काही वृत्तांच्या अनुसार मारेकरी म्हणून अटक करण्यात आलेले युवक व्यावसायिक मारेकरी नाहीत. तर ते कुशवाहा याचे मित्र आहेत. रघुवंशी याला मारण्याची योजना त्याच्या लग्नापूर्वीच शिजविण्यात आली होती, असेही दिसून येत आहे.