मनपाच्या मराठी विषयपत्रिकेत गंभीर चुका
महापौरांऐवजी राष्ट्रपतींचा उल्लेख, सुमार भाषांतराचा प्रत्यय
बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची माहिती मराठीतून देताना भाषांतर करताना अनेक चुका झाल्या आहेत. काही चुका इतक्या गंभीर आहेत की त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. बेळगाव महानगरपालिकेत अधिकाधिक मराठी भाषिक नगरसेवक असतानाही सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेमध्ये भरमसाट चुका असल्याने याबाबत मनपाला जाब कोण विचारणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बेळगाव महानगरपालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 29 रोजी सकाळी 11.30 वाजता महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. स्थायी समितीच्या कामकाजाचे निरीक्षण नोंदविण्यासोबतच मागील सभेमध्ये तहकूब केलेले मुद्दे, 2024-25 च्या निधीतून विकासकामांना मान्यता, नगरसेवकांचा अभ्यास दौरा, महापौर करंडक यासह इतर विषयांवर चर्चा होणार आहे. या सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका महापालिकेच्यावतीने शुक्रवारी सर्व नगरसेवकांना देण्यात आली. यामध्ये मराठीत भाषांतरित करण्यात आलेल्या विषयपत्रिकेमध्ये अनेक चुका आहेत. काही ठिकाणी नगरसेवकऐवजी शहरसेवक असा उल्लेख झाला आहे. तर महापौरांऐवजी राष्ट्रपतींच्या परवानगीने इतर मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे देण्यात आल्याने मराठी भाषेवरच दरवेळी अन्याय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनपाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार
महापालिकेमध्ये मराठी नगरसेवक अधिक असल्यामुळे सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका मराठीतून देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार विषयपत्रिका मराठीतून देण्यात आली खरी. परंतु, त्यामध्ये असंख्य चुका आहेत. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे.
-रवी साळुंखे (नगरसेवक)