आयर्लंड महिला संघाचा मालिका विजय
शेवटच्या सामन्यात लंका विजयी, चमारी अट्टापटू सामनावीर
वृत्तसंस्था/ बेलफास्ट
यजमान आयर्लंड आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका आयर्लंडने 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील मंगळवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात लंकेने आयर्लंडचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. लंकेची कर्णधार चमारी अट्टापटूला ‘सामनावीर’ तर आयर्लंडच्या आर्लेनी केलीला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडचा डाव 46.3 षटकात 122 धावांत आटोपला. त्यानंतर लंकेने 23.1 षटकात 2 बाद 123 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला. या मालिकेत लंकेने हा शेवटचा सामना जिंकून आयर्लंडला व्हाईटवॉशची संधी मिळू दिली नाही.
आयर्लंडच्या डावामध्ये आर्लेनी केलीने 75 चेंडूत 6 चौकारांसह 35, ली पॉलने 1 चौकारासह 19, टेक्टरने 1 चौकारासह 17, सार्जंटने 1 चौकारासह 16 तर मॅग्युरीने 1 चौकारासह नाबाद 10 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 12 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे कुलसुर्या आणि चमारी अट्टापटू यांनी प्रत्येकी 3 तर निशानसेलाने 2 गडी बाद केले. प्रियदर्शिनी व कांचन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावामध्ये कर्णधार अट्टापटूने 49 चेंडूत 10 चौकारांसह 48 तर समर विक्रमाने 56 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 48 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी केली. दिलहारीने नाबाद 10 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 19 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे केनींग आणि सार्जंट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: आयर्लंड 46.3 षटकात सर्वबाद 122 (केली 35, पॉल 19, टेक्टर 17, सार्जंट 16, मॅग्युरी 10, अवांतर 6, अट्टापटू 3-15, कुलसुर्या 3-35, निशानसेला 2-35, प्रियदर्शिनी 1-7, कांचन 1-14), लंका : 23.1 षटकात 2 बाद 123 (गुणरत्ने 9, अट्टापटू 48, समरविक्रमा नाबाद 48, दिलहारी 10, अवांतर 8, केनिंग 1-14, सार्जंट 1-38)