For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेरेना पराभूत, ओसाका तिसऱ्या फेरीत

06:34 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेरेना पराभूत  ओसाका तिसऱ्या फेरीत
Advertisement

व्हेरेव्ह , स्वायटेक, रायबाकिना दुसऱ्या फेरीत : विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस : वावरिंका, शेल्टन स्पर्धेबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था,/ लंडन

अमेरिकेचे माजी चॅम्पियन सेरेना विल्यम्सचे विम्बल्डनमधील बहुप्रतीक्षित पुनरागमन  पहिल्याच फेरीतील पराभवाने संपुष्टात आले. तिचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पण विम्बल्डनमधील पहिला अडथळा तिला पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या माया जॉईंटने तिला तीन सेट्समध्ये पराभूत केले. जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, झेक प्रजासत्ताकचा याकुब मेन्सिक, पोलंडची इगा स्वायटेक, कझाकची इलेना रायबाकिना यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसरी फेरी गाठली तर जपानच्या नाओमी ओसाकाने तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. बेन शेल्टन, वावरिंका यांचे आव्हान समाप्त झाले.

Advertisement

वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या सेरेना विल्यम्सने चार वर्षानंतर पुनरागमन केले.  तिने जॉईंटविरुद्ध संघर्षही केला. पण अखेर तिला 6-3, 6-7 (6-8), 6-3 असा पराभव स्वीकारावा लागला. पराभूत झाल्याने 44 वर्षीय सेरेनाला विम्बल्डनमध्ये एकेरीत विजय मिळविणारी सर्वात वयस्कर खेळाडू होण्याची तिची संधी हुकली. यापूर्वी 2004 मध्ये मार्टिना नवरातिलोव्हाने हा पराक्रम केला होता. प्रेक्षकांनी सेरेनाचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले आणि नंतर कोर्टवरून परततानाही तिला मानवंदना दिली. जॉईंटची पुढील लढत फिलिपिन्सच्या 29 व्या मानांकित अलेक्झांड्रा इआलाशी होईल. जपानच्या नाओमी ओसाकाने एकेरीची तिसरी फेरी गाठताना रशियाच्या अॅनास्तेशिया गॅसानोव्हाचा 6-3, 6-2 असा पराभव केला.

पुरुष एकेरीत 29 वर्षीय व्हेरेव्हला ब्लॉक्सने विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडले. मागील वर्षी पहिल्याच फेरीत पराभूत झालेला व्हेरेव्ह यावेळी ब्लॉक्सवर 6-4, 6-7 (8-10), 7-6 (7-5), 7-6 (7-0) अशी मात करून दुसरी फेरी गाठली. विम्बल्डनमध्ये व्हेरेव्हला चौथ्या फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. अल्कारेझ नसल्याने यावेळी अंतिम फेरी गाठण्याची त्याला संधी आहे. त्याची दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या व्हॅलेन्टिन रॉयरशी होईल. झेकच्या मेन्सिकलाही विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने ब्रिटनच्या टॉबी सॅम्युएलचा 5-7, 6-3, 6-3, 3-6, 7-6 (7-9) असा पराभव केला.

स्वित्झर्लंडच्या 41 वर्षीय स्टॅनिसलास वावरिंकाचे आव्हान पहिल्याच फेरीत इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने 6-7 (9-7), 7-6 (18-16), 7-6 (9-7), 7-6 (7-5) असे संपुष्टात आणले. विम्बल्डनमधील शेवटच्या सहभागानंतर वावरिंकाने चाहत्यांना अभिवादन करीत निरोप घेतला. अमेरिकेच्या बेन शेल्टनलाही पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. फिनलंडच्या पात्रता फेरीतून आलेल्या ओटो व्हर्टानेनने शेल्टनचा 6-4, 3-6, 6-7 (8-10), 6-2, 7-6 (11-9) असा पाच सेट्सच्या झुंजार लढतीत पराभव केला.

महिला एकेरीच्या अन्य सामन्यात विद्यमान विजेत्या व तिसऱ्या मानांकित इगा स्वायटेकलाही विजयासाठी झगडावे लागले. दुसरी फेरी गाठताना तिने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडवर 6-1, 2-6, 6-3 अशी मात केली. तिसऱ्या सेटमधील पहिला गेम दीर्घ काळ चालला. त्याते दहा वेळा ड्यूस झाले होते. अखेर तिने बिनतोड सर्व्हिस करीत सामना संपवला. दुसरे मानांकन असलल्या व 2022 ची चॅम्पियन इलेना रायबाकिनालाही संघर्ष करावा लागला. फ्रान्सच्या पदार्पण करणाऱ्या लोइ बॉइसनवर तिने 6-4, 1-6, 6-3, अशी मात केली. गेल्या वर्षी उपविजेतेपद मिळविलेल्या अमांदा अॅनिसिमोव्हाने ग्रँडस्लॅममध्ये विजयी पुनरागमन करताना पात्रता फेरीतून आलेल्या लिना गोरचेस्काचा 6-3, 6-2 असा पराभव केला. तिची पुढील लढत पेत्र मार्सिन्को किंवा सोफिया केनिन यापैकी एकीशी होईल.

Advertisement
Tags :

.