सर्बियाचा जोकोविच विजेता
►वृत्तसंस्था/ पॅरीस
सर्बियाचा टॉप सिडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने रविवारी येथे पॅरीस मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविताना बल्गेरियाच्या डिमीट्रोव्हचा पराभव केला. जोकोविचने आतापर्यंत ही स्पर्धा सातवेळा जिंकली आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 36 वर्षीय जोकोविचने डिमीट्रोव्हचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. आता या जेतेपदामुळे 2023 च्या टेनिस हंगामाअखेर एटीपीच्या मानांकनात जोकोविच आपले अग्रस्थान कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आतापर्यंत त्याने आठवेळा वर्षअखेरीस मानांकनात अग्रस्थान पटकाविले आहे. पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील जोकोविच सर्वात जुना चॅम्पियन्स ठरला आहे. जोकोविचने आपल्या वैयक्तीक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेतील 40 वे जेतेपद मिळविले आहे. तसेच त्याने अलिकडच्या कालावधीत सलग 18 सामने जिंकले आहेत. अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत जोकोविचने विजेतेपद पटकाविले असून त्याचे हे 24 वे ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील एकेरीचे अजिंक्यपद आहे. जोकोविचने स्पेनच्या नदालच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती.
बोपण्णा-एब्डन उपविजेते
या स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या सामन्यात रविवारी भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार एब्डन यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मेक्सीकोचा गोंझालेज आणि फ्रान्सचा व्हॅसेलीन याने बोपण्णा आणि एब्डन यांचा 6-2, 5-7, 10-7 असा पराभव करत दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले.